इयत्ता दहावीचा निकाल आज, सोमवारी माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने संकेतस्थळावर जाहीर केला. नगर जिल्हय़ाचा निकाल पुणे विभागात सर्वाधिक म्हणजे ९५.४३ टक्के (नियमित विद्यार्थ्यांचा) लागला. दहावीचा निकाल दरवर्षी उंचावत चालला आहे. तो यंदा जिल्हय़ासाठी गतवर्षीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी अधिक आहे. नेहमीप्रमाणे उत्तीर्णामध्ये मुलींनी बाजी मारली आहे.
नियमित व पुनपरीक्षार्थी असे दोन्ही मिळूनचा जिल्हय़ाचा निकाल ९३.८७ टक्के लागला आहे. तोही पुणे विभागात नगरचा सर्वाधिक आहे. मंडळाने आज दुपारी एक वाजता संकेतस्थळावर निकाल जाहीर केल्यानंतर शाळा, सायबर कॅफेमधून विद्यार्थ्यांची निकाल पाहण्यासाठी झुंबड उडाली होती. विद्यार्थ्यांना गुणपत्रक सात दिवसांनंतर म्हणजे दि. १५ रोजी शाळांतून उपलब्ध केली जाणार आहेत.
यंदा दहावीच्या परीक्षेसाठी ७३ हजार ५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात ७२ हजार ४४५ जण परीक्षेला बसले. त्यातील ६८ हजार २८८ उत्तीर्ण (९३.८७ टक्के) झाले. पुणे विभागाचा निकाल ९१.७९ टक्के लागला. केवळ नियमित परीक्षा देणा-यांमध्ये ६६ हजार ६६१ जण (९५.४३ टक्के) उत्तीर्ण झाले. त्यात मुलांमध्ये ३९ हजार ३८१ पैकी ३७ हजार १४९ (९४.७६ टक्के) तर मुलींमध्ये ३० हजार ७६५ पैकी २९ हजार ५१२ (९६.२९ टक्के) उत्तीर्ण झाले.
१७ हजार ६८२ विद्यार्थी विशेष प्रावीण्य श्रेणीत, प्रथम वर्गात २६ हजार ९९२, द्वितीय श्रेणीत १८ हजार ६९६ तर तृतीय वर्गात ३ हजार २९१ जण उत्तीर्ण झाले.
तालुकानिहाय उत्तीर्ण टक्केवारीचे प्रमाण पुढीलप्रमाणे : अकोले ९३.१, जामखेड ९६.३०, कर्जत ९५.१०, कोपरगाव ९५.१९, नगर ९६.५२, नेवासे ९४.४५, पारनेर ९६.७०, पाथर्डी ९६.५१, राहाता ९५.७२, राहुरी ९४.५८, संगमनेर ९५.७५, शेवगाव ९६.३२, श्रीगोंदे ९६.६० व श्रीरामपूर ९२.२७.
भविष्यात निकाल घटणार?
दहावीचा निकाल दरवर्षी उंचावतो आहे. त्यामध्ये लेखी परीक्षेव्यतिरिक्त शाळांकडे असलेल्या २० गुणांच्या अधिकाराचा वाटा महत्त्वपूर्ण आहे. मात्र पुढील वर्षीपासून या पद्धतीत बदल करण्यात आला आहे. उत्तीर्ण होण्यासाठी लेखी परीक्षेत ८० पैकी किमान २० टक्के गुण हवे आहेत. त्यामुळे यंदा उंचावलेला निकाल पुढील वर्षी खाली येण्याची शक्यता काही शाळांच्या मुख्याध्यापकांनी व्यक्त केली.