जिल्हा नियोजन मंडळाच्या एका जागेसाठी आज, मंगळवारी १७३ मतदारांपैकी १६६ जणांनी (सुमारे ९६ टक्के) मतदान केले. ७ नगरसेवक गैरहजर राहिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रियदर्शनी सभागृहात उद्या सकाळी ८ वाजता मतमोजणी होईल.
लहान निर्वाचन क्षेत्रातील (जिल्ह्य़ातील ८ नगरपालिका) एका जागेसाठी आशिष धनवटे (श्रीरामपूर), भरतकुमार नहाटा (श्रीगोंदे) व दिनार कुदळे (कोपरगाव) असे तिघे उमेदवार आहेत. श्रीरामपूरमधील, २९, श्रीगोंद्यातील १९, पाथर्डी १७, कोपरगाव २६ येथील सर्व मतदार नगरसेवकांनी मतदानासाठी हजेरी लावली. परंतु संगमनेरमधील २७ पैकी इम्रान खान, अल्पना तांबे, श्रीराम गणपुले या तिघांनी, राहुरीतील २० पैकी चंद्रकांत मुंडे, देवळाली प्रवरातील १८ पैकी शुभांगी पटारे व सुरेश थोरात, राहातामधील १७ पैकी ज्योती गाडे हे सात जण मतदानाला गैरहजर राहिले.
मतदान घडवून आणण्यासाठी उमेदवारही प्रयत्नशील होते. मतदान पसंतिक्रमानुसार होते. त्यामुळे मतमोजणीची प्रक्रिया किचकट आहे. मतमोजणीत वैध मतांचा कोटा ८४ ठरण्याची शक्यता आहे. पहिल्या फेरीत तो पूर्ण करणारा विजयी होण्याची शक्यता आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी शरद जाधव व सहायक अधिकारी म्हणून प्रांताधिकारी वामन कदम काम पाहात आहेत.
जिल्हा नियोजन मंडळावर नगरच्या महापालिका क्षेत्रातून (मोठे नागरी निर्वाचन क्षेत्र) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणेश भोसले, शिवसेनेच्या सुरेखा कदम व काँग्रेसचे सुनीलकुमार कोतकर यांची सदस्य म्हणून याआधीच बिनविरोध निवड झाली.