आगामी दहावी व बारावीच्या परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांंना आधारकार्ड क्रमांक सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (पुणे) तर्फे या निर्णयाबाबत राज्यातील सर्व विभागीय शिक्षण मंडळांना सुचित करण्यात आले आहे. यंदा या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना ते अनिवार्य ठरली आहे. याविषयी विभागीय शिक्षण मंडळांनी फे ब्रुवारी-मार्च २०१७ च्या परीक्षेचे अर्ज भरतांना प्रत्येक विद्यार्थ्यांचा आधारकार्ड क्रमांकाचा त्यात उल्लेख करण्याबाबत मुख्याध्यापक व संबंधित प्राचार्यांना कळविण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, ही बाब कितपत अंमलात येईल, याविषयी साशंकता आहे. कारण, राज्यभरातील अशा विद्यार्थ्यांचे आधारकार्ड तयार करण्याचे काम १०० टक्के पूर्ण झालेले नाही. बऱ्याच आधारकार्डधारक विद्यार्थ्यांना त्यांच्या आधारकार्डातील जन्मतारीख, नाव, पत्ता याबाबतच्या त्रुटी दुरुस्त करायच्या आहेत. त्यासाठी अनेक शाळांचा पाठपुरावा सुरू आहे. याविषयी विचारणा केल्यावर नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय गणोरकर म्हणाले की, आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले असून मुख्याध्यापक त्याबाबत जबाबदार राहतील, पण याविषयी प्रथम सर्व विद्यार्थ्यांचा आढावा घेतला जाईल. आधारकार्ड नसलेले विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये म्हणून पर्याय देण्याचा विचार वरिष्ठ पातळीवर होऊ शकतो.

दहावी-बारावीच्या परीक्षेत काही जिल्ह्य़ात बोगस विद्यार्थ्यांनी इतरांच्या प्रश्नपत्रिका सोडवून देण्याचे प्रकार घडले होते. शाळेत न जाता थेट परीक्षेलाच दाखल होणारेही विद्यार्थी असल्याच्या तक्रारींच्या पाश्र्वभूमीवर आधारकार्ड अनिवार्य करण्यात आल्याचे म्हटले जाते. या माध्यमातूनच खरा विद्यार्थी परीक्षेला बसेल, अशी मंडळाची भावना आहे.