‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या औरंगाबाद व खान्देश विभागीय अंतिम फेरीत शहरातील देवगिरी कला वरिष्ठ महाविद्यालयाच्या आकांक्षा शरद चिंचोलकर हिने बाजी मारली.2vakta2  मुंबईत १५ फेब्रुवारीला होणाऱ्या महाअंतिम फेरीत आकांक्षा ही औरंगाबाद व खान्देश विभागाचे प्रतिनिधित्व करील. पाच हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र हे पहिले पारितोषिक तिने जिंकले.
औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रसाद सुधाकर गावडे याला तीन हजार रुपये व प्रमाणपत्र हे दुसरे, तर देवगिरी कला पदव्युत्तर महाविद्यालयाचा भरत रिडलॉन याला दोन हजार रुपये व प्रमाणपत्र हे तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. निकिता सुनील पाटील (देवगिरी कला कनिष्ठ महाविद्यालय) व शौनक श्रीकांत कुलकर्णी (एमआयटी महाविद्यालय, औरंगाबाद) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
नाथे समूह प्रस्तुत, पृथ्वी एडिफाइस व भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने, तसेच जनकल्याण सहकारी बँकेच्या मदतीने यंदा प्रथमच या स्पर्धेचे आयोजन केले होते. पहिल्या फेरीप्रमाणेच अंतिम फेरीत निवड झालेल्या सर्वच स्पर्धकांचा उत्साह लक्षवेधक होता. विभागीय अंतिम फेरीत एकूण ११ स्पर्धकांनी सहभाग घेतला. यातील प्रत्येकाला सहभागाबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले. अंतिम फेरीच्या वेळी देवगिरीचे सभागृह तुडुंब भरले होते. सर्वच विषयांची नेमकी मांडणी, अभ्यासपूर्ण विवेचन, सुस्पष्ट उच्चार, प्रेक्षकांना आपला मुद्दा अधिक प्रभावीपणे पटवून देण्याची तयारी, या स्पर्धकांच्या वैशिष्टय़ांचे परीक्षकांनी आवर्जून कौतुक केले. इतिहासाचे प्राध्यापक डॉ. गणेश राऊत, प्रा. अनुया दळवी, प्रसिद्ध कवी प्रा. दासू वैद्य यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. परीक्षकांसह देवगिरीचे उपप्राचार्य शिवाजी गायकवाड व अशोक तेजनकर, ‘लोकसत्ता’ चे मुख्य वितरण व्यवस्थापक मुकुंद कानिटकर यांची उपस्थिती होती.
स्पर्धेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. गणेश राऊत यांनी वक्तृत्व कला वाढविण्यासाठी इतिहास विषयाशी अधिक जवळीक साधणे आवश्यक असल्याचे नमूद केले. वर्तमानातील अनेक समस्यांची मुळे भूतकाळात आहेत. त्यामुळे विषयाचा अभ्यास करताना वक्तृत्व स्पर्धेतील सहभाग उपयुक्त ठरणारा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. प्रा. दळवी यांनी या स्पर्धेत विद्यार्थ्यांना दिलेले विषय किचकट, त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारे असल्याचे निरीक्षण नोंदविले. प्रा. वैद्य यांनी, वक्तृत्व स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी आपला आवाज सुस्पष्ट हवा, आपले शब्दोच्चार शेवटच्या रांगेपर्यंत व्यवस्थित ऐकू जाणे, स्वच्छ व स्पष्ट मांडणी हे घटक महत्त्वाचे मानून त्या दृष्टीने तयारी करण्याची गरज व्यक्त केली.