17 August 2017

News Flash

पुण्यात फेब्रुवारीमध्ये अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन

महाराष्ट्र राज्य अण्णाभाऊ साठे साहित्य परिषदेच्या वतीने पुणे येथे १६ व १७ फेब्रुवारी रोजी

प्रतिनिधी, नाशिक | Updated: December 26, 2012 4:56 AM

महाराष्ट्र राज्य अण्णाभाऊ साठे साहित्य परिषदेच्या वतीने पुणे येथे १६ व १७ फेब्रुवारी रोजी तिसरे राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांची निवड करण्यात आली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती साहित्य परिषदेचे प्रमुख संजय गालफाडे यांनी दिली.
संमेलन स्थळास क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे नगरी हे नाव देण्यात येणार आहे. उद्घाटन सत्रानंतर ‘सामाजिक परिवर्तनासाठी कुठल्या योगदानाची गरज’ या विषयावर दिलीप अर्जुने यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी तीन वाजता परिसंवाद होणार आहे. या परिसंवादात औरंगाबादचे सुरेश चौथाईवाले, कोल्हापूरचे शरद गायकवाड, आंबेजोगाई येथील आर. डी. जोगदंड, प्रकाश मुराळकर, मच्छिंद्र आल्हाट सहभागी होतील. सायंकाळी प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘अण्णाभाऊंच्या साहित्यातील वैविध्यता’ या विषयावर पुणे येथील मरतड साठे, ठाण्याचे बापू पाटील, नायगावचे प्रा. डॉ. शंकर गड्डमवार, प्रा. डॉ. बजरंग कोरडे, भाऊसाहेब सोनवणे, भाऊसाहेब थोरात, सतीश कावडे, ज्येष्ठ पत्रकार भारत दाढेल आदी मान्यवर सहभागी होतील. रात्री उशीरा लहु कानडे यांच्या अध्यक्षतेखाली काव्य संमेलन होणार आहे.
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता बीड येथील प्रा. सुशिला मोराळे यांच्या अध्यक्षतेखाली ‘अण्णाभाऊंच्या साहित्यातील क्रांतिकारी महिला’ या विषयावर नांदेडच्या सारिका भंडारे, लातूरच्या ज्ञानेश्वरी माने, नाशिकच्या निलीमा साठे, पुण्याच्या रुपाली अवचरे, औरंगाबादचे दिगंबर नेटके, नाशिकचे डॉ. भास्कर म्हरसाळे मार्गदर्शन करणार आहेत. दुपार सत्रात  एच. पी. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली व अण्णाभाऊ सेनेचे राज्याध्यक्ष संजय गालफाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘स्वातंत्र्य मिळाले पण सामाजिक व आर्थिक समानता कधी’ या विषयावर चर्चासत्र होईल. यामध्ये नागपूरचे प्रा. डॉ. अश्रृ जाधव, मुंबई येथील सत्यनारायण राजहंस, संगमनेरचे प्रा. डॉ. रघुनाथ खरात, लातूरचे प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर सहभागी होणार आहेत. सायंकाळच्या सत्रात संमेलनाध्यक्ष डॉ. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली व पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप होणार आहे.     

First Published on December 26, 2012 4:56 am

Web Title: aanabhau sathe sahitya annual in february in pune
  1. No Comments.