चारही रस्त्यांवर नाकाबंदी, गावात मतदान केंद्राभोवती दोनशे पोलिसांचा खडा पहारा, जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकारी तळ ठोकून अशा वातावरणात आंधळेवाडीत गुरुवारी ८५.९६ टक्के मतदान झाले.
भाग्यश्री शिवाजी वनवे या महिलेने मतदानाचा पहिला हक्क बजावला. केंद्र बळकावल्याच्या गुन्हय़ात कोठडीत असलेल्या पाच आरोपींनीही बंदोबस्तात मतदान केले. बीड लोकसभा मतदारसंघातील आंधळेवाडी (तालुका आष्टी) येथे गेल्या १७ एप्रिलला जि. प.च्या मतदान केंद्रावर संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास भाजप समर्थकांनी मतदान केंद्र बळकावून मतदान केल्याचे उघड झाले. या प्रकारानंतर गुन्हा दाखल झाला. ३९५ पकी ३०३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असताना मतदान यंत्रात मात्र ३११ मतांची नोंद झाली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या शिफारशीनंतर २४ एप्रिलला, आज येथे फेरमतदान घेण्यात आले.
जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी भल्या पहाटेच फौजफाटय़ासह गावात दाखल झाले. गावच्या चारही बाजूंच्या रस्त्यांवर पोलिसांनी नाकाबंदी करून मतदान केंद्राला वेढा टाकला. गावातही अनेक ठिकाणी बंदोबस्त तनात करण्यात आला. आंधळेवाडी ही जवळपास सातशे लोकसंख्येची वाडी. गावात एकदम मोठय़ा प्रमाणात बंदोबस्त लागल्यामुळे ग्रामस्थांमध्ये सुरुवातीला दहशतीचे वातावरण पसरले. मात्र, अधिकाऱ्यांनी निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केल्याने सकाळी सात वाजता मतदान केंद्रावर मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. राष्ट्रवादी उमेदवाराचे प्रतिनिधी म्हणून अॅड. अनिल आंधळे, तर भाजपचे प्रतिनिधी म्हणून महादेव आंधळे यांनी काम पाहिले. सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी गावातील भाग्यश्री शिवाजी वनवे या महिलेने मतदानाचा पहिला हक्क बजावला. नंतर घरातून लोक बाहेर पडत मतदान केंद्रावर धडकले. सकाळी नऊपर्यंत ३३ टक्के, तर दुपारी एक वाजता ७० टक्के मतदान झाले. सायंकाळी ६ वाजता एकूण ३९५पकी ३३७ मतदारांनी हक्क बजावून ८५.९६ टक्के मतांची नोंद केली. पहिल्या वेळेपेक्षा २६ अधिक मतदान झाले.
कोठडीतील पाच आरोपींचे मतदान
मतदान केंद्र बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या सोळा आरोपींना न्यायालयाने बुधवारी न्यायालयीन कोठडी दिली. सायंकाळी उशिरा यातील नऊजणांचा जामीन झाल्यामुळे या कार्यकर्त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. कोठडीतील सातपकी पाचजणांचे मतदान असलेल्या संभाजी वनवे, अमोल सोनवणे, दादासाहेब आंधळे, संदीप गोल्हार व ज्ञानेश्वर गोपाळघरे यांना आष्टी पोलिसांनी बंदोबस्तात सायंकाळी पावणेपाच वाजता मतदान केंद्रावर आणले व त्यांनीही मतदानाचा हक्क बजावला.