जिल्हाध्यपदाच्या नियुक्तीवरून राष्ट्रवादीची जिल्ह्य़ात नाचक्की झाली. घनश्याम शेलार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर नियुक्तीची घाई झालेल्या या पक्षाला नवा जिल्हाध्यक्षही नियुक्ती जाहीर केल्यानंतर बारा तासात बदलावा लागला. रविवारी करण्यात आलेली काशिनाथ दाते यांची नियुक्ती सोमवारी रद्द करून त्यांच्या जागी माजी आमदार पांडुरंग अभंग यांची नियुक्ती करण्यात करण्यात आली, रात्रीतून ही सूत्रे हलली. पक्षाला जिल्ह्य़ात नामुष्कीचा सामना तर करावा लागलाच, मात्र यातील पक्षाध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील गटातटाचे राजकारणही उघडपणे पुढे आले आहे.
रविवारी दुपारी अचानक शेलार यांनी अचानक पक्षाचा राजीनामा दिल्याने त्यानंतर काही तासांतच जिल्हाध्यक्षपदी दाते यांची नियुक्ती करण्यात आली. त्याची अधिकृत घोषणाही करण्यात आली. सोमवारी नगरला मेळावा घेऊन त्याचा औपचारिक कार्यक्रम होणार होता. तो झालाही, मात्र या मेळाव्यात दाते यांच्याऐवजी जिल्हाध्यक्ष म्हणून अभंग यांची नियुक्ती जाहीर करून राष्ट्रवादीने वेगळ्याच गोंधळाला आमंत्रण दिले. मिळालेला माहिती नुसार शेलार यांच्या राजीनाम्याचा पक्षावर काहीही परिणाम झाला नाही, हे दाखवण्यासाठी घाईतच दाते यांची नियुक्ती करण्यात आली होती. ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शिफारस होती, मात्र त्याला आक्षेप घेत शदर पवारनिष्ठांनी रातोरात त्यांच्याकडे धाव घेऊन दाते यांची जाहीर झालेली नियुक्ती रद्द करून अभंग यांची पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यास त्यांना भाग पाडले. यात सरळ सरळ शरद पवार-अजित पवार असे राजकारण झाले. यात पक्षाचे जिल्हा निरीक्षक अंकुश काकडे यांची मात्र चांगलीच त्रेधातिपीट झाली.
आमदार बबनराव पाचपुते, पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष दादा कळमकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, बाळासाहेब जगताप, माजी नगराध्यक्ष शंकरराव घुले यांनी सकाळी पुण्यात शरद पवार यांची भेट घेऊन जिल्हाध्यक्षपदी जाहीर झालेली नियुक्ती बदलण्यास भाग पाडले. अजित पवारांच्या निर्णयानुसार झालेली दाते यांची नियुक्ती त्यामुळे औटघटकेची ठरली.