आदिवासींच्या ताब्यात असलेल्या वनहक्क जमिनीचे दावे ९९.५५ टक्के निकाली काढण्यात आल्याचा सरकारचा दावा खरा नसून आजही वनहक्क जमिनीचे हजारो दावे प्रलंबित असून असंख्य दावे हटविले आहेत, शिवाय वनहक्क समितीने असंख्य आदिवासींच्या जमिनीची मोजणी न केल्याच्या निषेधार्थ कष्टकरी संघटनेने शिराज बलसारा आणि ब्रॉयन लोबो यांच्या नेतृत्वाखाली हजारो आदिवासी स्त्री-पुरुषांनी उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन आरंभिले आहे.
कष्टकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने डहाणू उपविभागीय अधिकारी शैलेश नवल यांना एक निवेदन दिलेले असून, निवेदनात म्हटले आहे की, आदिवासी विकास आयुक्तांनी प्रशासनाकडे सादर झालेल्या वनहक्क दाव्यापैकी ९९.५५ टक्के दावे निकाली काढण्यात आल्याचा दावा केला आहे. मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. ठाणे जिल्ह्य़ात ग्रामसभेने स्वीकारलेल्या ५२ हजार ८९८ दाव्यांपैकी जिल्हास्तरीय वनहक्क समितीने फक्त १६ हजार २८३ दावे मंजूर केलेले आहेत. उर्वरित सर्व प्रलंबित दावे मंजूर करण्यासाठी सन २०११ मध्ये उपविभागीय कार्यालयासमोर उपोषण आरंभिले होते. त्यावेळी सदरहू समितीने मोजलेले दावे प्राधान्याने निकाली काढण्यात येतील, दोन हजार दावे ताबडतोब निकाली काढण्यात येऊन, वनहक्क समितीने जी. पी. एस. वापरून तयार केलेले दावे असलेल्या प्रकरणात सनियंत्रित समितीच्या आढावा बैठकीत प्रत्येक प्रकरणाचा निर्णय घेण्यात येईल. असे आश्वासन दिले असतानाही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. या सर्व आश्वासनांची पूर्तता करण्यात यावी यासाठी हे धरणे आंदोलन कष्टकरी संघटनेच्या प्रमुख शिराज बलसारा यांच्या नेतृत्वाखाली आरंभिले आहे. डहाणू उपविभागीय कार्यालयासमोर हजारो आदिवासी स्त्री-पुरुष हातात जेवण घेऊन वस्तीला राहण्याच्या हेतूनेच धरणे आंदोलनाला बसले आहेत.