मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली नांदगावजवळ असलेल्या तावडेवाडी पुलाजवळ स्विफ्ट डिझायर कार रस्त्यालगत असणाऱ्या सुरूच्या झाडावर जोरदार धडकल्याने गाडीतील हिमाचल प्रदेशमधील तीन प्रवासी रविवारी ठार झाले. या अपघातात कारचालक गंभीर जखमी झाला. ठार झालेल्या प्रवाशांत भूपेंद्रसिंग ठाकूर (५४), कृष्ण सीताराम चंद्र (५३), बलजिर सिंग (५२) सर्व रा. हिमाचल प्रदेश यांचा समावेश आहे. त्यांचे कुटुंबीय दुसऱ्या कारमध्ये बसले असल्याने सुदैवाने अपघातातून बचावले. मात्र चालक विकासकुमार प्रसाद (२६) रा. बिहार हा जखमी झाला. हिमाचल प्रदेशमधून थेट गोवा या ठिकाणी पर्यटनासाठी जाणाऱ्या गाडीला रविवारी सकाळी ६.३० वा.च्या सुमारास अपघात घडला. 

अपघातातील स्विफ्ट डिझायर एमएच ०६/ एएस ६३१९ चा पुढील भाग सुरूच्या झाडावर धडकला होता. ठार झालेले हिमाचल प्रदेशमधील कुटुंबाला घेऊन गोवा येथे पर्यटनासाठी जात होते. त्यांनी मुंबईत आल्यावर दोन गाडय़ा भाडय़ाने घेऊन प्रवास सुरू केला होता. अपघातात ठार झालेले तिघेही एका गाडीत, तर कुटुंब दुसऱ्या गाडीत होते. गोवा राज्यात पर्यटनासाठी जाणाऱ्या बलवीर सिंग, भूदेंद्र सिंग ठाकूर व कृष्ण चंद्र यांचा अपघात झाल्याचे कळताच पोलीस धावले, पण हे तिघेही अपघातात ठार झाले होते. चालक गाडीतून बाहेर फेकला गेला होता त्यामुळे तो गंभीर होता. कणकवली पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.