मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघातांचे सत्र थांबण्याची चिन्ह दिसत नाही. रविवारी झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात एक जण ठार आणि नऊ जण गंभीर जखमी झाले. सुट्टीच्या दिवशी झालेल्या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.  द्रुतगती मार्गावर रसायनी पोलीस  स्टेशनच्या हद्दीत रीस गावाजवळ तीन गाडय़ा एकमेकांना धडकल्या. यात एक जण ठार, तर सात जण जखमी झाले. यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक कोलमडली.  स्विफ्ट डिझायर, इको आणि इंडिका यांच्यात धडक झाल्याने हा अपघात झाला. दुपारच्या सुमारास टेम्पोला आग लागल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली, तर संध्याकाळच्या सुमारास अमृतांजन पुलाजवळ सिमेंट मिक्सरचा ट्रक पलटी झाल्याने मुंबईकडे जाणारा एक मार्ग, तर पुण्याकडे जाणारे दोन मार्ग बंद झाले. त्यामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.  शनिवार-रविवारची सुट्टी संपवून घराकडे परतणाऱ्या प्रवासी आणि वाहनचालकांचे हाल झाले. एकाच दिवसात घडलेल्या तीन घटनांमुळे महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला.

गेल्याच आठवडय़ात एका भीषण अपघातात द्रुतगती १७ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे महामार्ग पोलीस आणि परिवहन विभागाने बेदरकार वाहनचालकांविरोधात कारवाई सुरू केली होती, मात्र तरीही महामार्गावर आज तीन अपघातांची नोंद झाली.  मुंबई- गोवा महामार्गावर कशेडी घाटात चोळाईजवळ झालेल्या विचित्र अपघातात चार जण जखमी झाले. मोटारसायकल आणि ट्रक यांना वाचवण्याच्या प्रयत्नात दोन्ही गाडय़ा रस्त्याच्या कडय़ाला जाऊन आदळल्या. सुदैवाने कठडा मजबूत असल्याने गाडय़ा दरीत कोळण्यापासून बचावल्या.

मात्र अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक आणि मोटारसायकल चालक घटनास्थळावरून पसार झाले.