अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने मोटारसायकलला धडक दिल्याने दोन जण जागीच ठार तर, एक युवक जखमी झाला आहे. चाळीसगाव-धुळे महामार्गावरील भोरस फाटय़ाजवळ मंगळवारी सकाळी हा अपघात झाला. ठार झालेले दोघे मेहुणबारे येथील रहिवासी आहेत. अपघातानंतर संतप्त जमावाने सुमारे सहा तास महामार्गावरील वाहतूक रोखून धरत ट्रॅक्टर पेटवून दिला.
चाळीसगाव तालुक्यात अवैधपणे वाळू वाहतूक करणाऱ्यांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत आहे. या अपघातासही वाळू वाहतूकदारच जबाबदार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मेहुणबारे ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी चाळीसगाव येथे मंगळवारी सकाळी सुरू झाली. या मतमोजणीस उपस्थित राहण्यासाठी संदेश प्रकाश देशमुख (२७), पवन शरद वाघ (१७) व अविनाश राजेंद्र वाघ हे तिघे मोटारसायकलवरून येत होते. सकाळी आठच्या सुमारास ते महामार्गावरील भोरस फाटय़ाजवळ आले असता वळणावर वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरखाली चिरडले गेले. संदेश व पवन हे दोघे जागीच ठार झाले. तर अविनाश हा जखमी झाला.
अपघात होताच ट्रॅक्टर चालक फरार झाला. अपघाताचे वृत्त कळताच मेहुणबारे येथील ग्रामस्थांनी चाळीसगाव-धुळे महामार्गावरील वाहतूक बंद पाडली. दुपारी दोनच्या सुमारास  वाहतूक सुरू झाली. संतप्त जमावाने अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रॅक्टर पेटवून दिला.  अपघातातील मृत संदेश हा पुणे येथे खासगी कंपनीत नोकरीस होता. निवडणूक निकालात संदेशची आई आशाबाई देशमुख व पवनचे वडील शरद वाघ हे दोघे विजयी झाले. परंतु मुलांच्या अपघाताने त्यांचा आनंद हिरावला गेला. अपघात प्रकरणी रात्री उशिरापर्यंत चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.