शिर्डी येथे साईदर्शनासाठी येत असलेल्या भक्तांची मोटार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले. हा अपघात शिर्डी-सिन्नर रस्त्यावर सावळीविहीर शिवारात, के. के. मिल्कनजीक रविवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास घडला. तिघेही मृत सातारा जिल्ह्य़ातील आहेत. सुरेश भागूजी जगताप (४४), रमेश बाबुराव यादव (२५) व कृष्णा विष्णू जगताप (३०, चालक सर्व रा. अंबावणी, पाटण, सातारा) अशी मृतांची नावे आहेत.
 संजय बाजीराव चव्हाण, कल्पेश कान्हू खळे, सचिन सुरेश जगताप, विजय रामचंद्र जगताप, सुरेश लक्ष्मण साळुंके, विश्वास लक्ष्मण सपकाळ (सर्व रा. गोरेगाव वेस्ट, मुंबई) हे सहा जखमी आहेत. जखमी व मयत हे नातेवाईक असून मुंबईत वेगवेगळ्या खासगी कंपन्यांमध्ये नोकरीस आहेत. कृष्णा जगताप यांनी जुनी क्वालिस गाडी खरेदी केली व मित्रांसमवेत शिर्डीला साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शनिवारी रात्री गोरेगाव येथून निघाले होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्यांची मोटार झाडावर आदळून अपघात झाला. यातील चार जखमींची परिस्थिती गंभीर असून त्यांना उपचारासाठी मुंबई येथे तर एकास नाशिकला हलविण्यात आले. उर्वरित एका जखमीवर शिर्डी येथे उपचार चालू आहेत. विश्वास सपकाळ यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिघांचे मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.