वेगाची हौस, वाहनचालकाचा निष्काळजीपणा किंवा दुर्लक्ष या गोष्टी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील (एक्स्प्रेस वे) अपघातांच्या वाढत्या प्रमाणास जबाबदार असल्याचे सांगितले जात असतानाच, या महामार्गाखालील भूगर्भातील हालचालीही याला बऱ्याच अंशी कारणीभूत असल्याचा धक्कादायक दावा एका संशोधनाद्वारे करण्यात आला आहे. या महामार्गावर असलेल्या ‘जिओपॅथिक स्ट्रेस झोन’मुळे (भूविकारजन्य ताण) ठरावीक पट्टय़ातच जास्त अपघात घडत असल्याचा निष्कर्ष महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) मधील सिव्हिल अभियांत्रिकी शाखेचे विभागप्रमुख डॉ. सुनील पिंपळीकर आणि सिंहगड अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनीअरिंगचे प्राचार्य डॉ. अविनाश खरात यांनी काढला आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातांपैकी बहुतांश विशिष्ट पट्टय़ामध्ये झाल्याचे निदर्शनास आले आहे. या अपघातांमागे ‘जिओपॅथिक स्ट्रेस’ हे एक कारण असल्याचे डॉ. पिंपळीकर यांनी त्यांच्या संशोधनामध्ये म्हटले आहे. या संशोधनानुसार, भूगर्भात होणाऱ्या हालचाली, त्यातून परावर्तित होणाऱ्या लहरी, त्यांची ऊर्जा यांबरोबर माणसाच्या शरीरातील ऊर्जेचा मेळ बसतो. माणसाचे शरीर हे भूगर्भातील लहरींना प्रतिसाद देत असते. मात्र जिओपॅथिक स्ट्रेस झोनमध्ये पृथ्वीच्या गर्भातून परावर्तित होणारी ऊर्जा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या लहरी या अधिक तीव्र असल्यामुळे त्याच्याशी चालकाच्या शरीरातील ऊर्जेचा मेळ बसत नाही. त्याचा परिणाम चालकाच्या शारीरिक क्रियांवर होतो. या पट्टय़ामध्ये शारीरिक ऊर्जेमध्ये साधारण आठ पटींनी वाढ होते, हृदयाचे ठोके कमी होतात, रक्तदाब आणि नाडीच्या ठोक्यांमध्ये फरक पडतो. या शारीरिक बदलांचा परिणाम मेंदूवरही होतो. त्यामुळे एखाद्या गोष्टीचे आकलन होऊन प्रतिसाद देण्याच्या क्रियेला वेळ लागतो. परिणामी, वाहनावरील ताबा सुटत असल्याचे लक्षात येण्यासाठी किंवा वाहन समोर आदळणार आहे हे लक्षात येऊन त्यानंतर ब्रेक दाबणे या क्रियेमध्ये वेळ जातो आणि त्यामुळे अपघात होतो.
जिओपॅथिक स्ट्रेस झोनमध्ये चालकाच्या शारीरिक स्थितीमध्ये मोठा फरक पडत असल्याचे डॉ. पिंपळीकर यांच्या निदर्शनास आले आहे. संपूर्ण महामार्गावर असे साधारण ४९ स्ट्रेस झोन असून त्यापैकी काही अधिक तीव्र असल्याचे डॉ. पिंपळीकर यांनी सांगितले. मात्र, प्रत्येक चालकावर जिओपॅथिक स्ट्रेसचा दुष्परिणाम होत नाही. चालकाची शारीरिक स्थिती कशी आहे, त्याने पुरेशी आणि योग्य प्रकारे विश्रांती घेतली आहे का, त्यानुसार त्याचे शरीर हे जिओपॅथिक स्ट्रेस झोनमध्ये प्रतिसाद देते, असे डॉ. खरात यांनी सांगितले.