राज्यातील १ लाख ३७ हजार खातेदार शेतकऱ्यांचा अपघाती विमा उतरवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती महसुलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. येत्या २ ऑक्टोबरला ही योजना लागू करण्यात येणार असून संबंधीत शेतकऱ्यांच्या विम्याचा हप्ता राज्य सरकारच भरणार आहे. आत्महत्येला मात्र ही योजना लागू नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गुरुवारी सायंकाळी पुण्याहून औरंगाबादला जाताना खडसे काही वेळ नगरला थांबले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी या शेतकरी विमा अपघाताची माहिती दिली.
खडसे म्हणाले की, दुर्दैवाने अपघातात जिवीत हानी झाल्यास या शेतकऱ्यांच्या वारसाला २ लाखांची मदत मिळेल. सर्पदंश, रस्ते अपघात, विहीरीत पडून मृत्यू आदी गोष्टी या विमा योजनेतत विचारात घेण्यात आल्या आहेत.
केंद्र सरकारची जीवनदायी योजनाही शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात येणार असून त्याची ३२० रुपयांची रक्कमही सरकार भरणार आहे. प्रारंभीच्या काळात यवतमाळ व उस्मानाबादमध्ये ही पथदर्शी योजना म्हणून सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती खडसे यांनी दिली.

विखे यांच्याशी सहमत
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. याबाबत विखे यांच्या भूमिकेशी आपण सहमत आहोत, असे खडसे म्हणाले. विखे यांच्या आग्रहानुसार कोकणातील पाणी गोदावरी खोऱ्यात आणावेच लागेल, अन्यथा झालेल्या पाणीवाटपानुसार नगर जिल्ह्य़ाच्या वाटय़ाला एक थेंबही येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीच्या आंदोलनाची खिल्ली
दुष्काळाच्या प्रश्नावर राष्ट्रवादीने सुरू केलेल्या आंदोलनाची खडसे यांनी खिल्ली उडवली. हे आंदोलन म्हणजे कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण आहे, असे सांगून खडसे म्हणाले, पंधरा वर्षे सत्तेत असताना शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन दूरदर्शी योजना राबवल्या असत्या तर, राष्ट्रवादीवर ही वेळ आली नसती.