येथील गाजलेल्या अॅड. कल्पना मंगल गिरी अत्याचार व हत्याकांड प्रकरणाला आठ महिने झाले. मात्र, यातील विक्रमसिंह चौहान व कुलदीपसिंह ठाकूर हे दोन आरोपी फरारी असून त्यांना कधी पकडणार, असा सवाल गिरी कुटुंबीयांनी केला आहे.
कल्पना गिरीचा गेल्या मार्चमध्ये निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणात चौघा आरोपींना आतापर्यंत अटक झाली. मनपातील काँग्रेस गटनेते माजी नगराध्यक्ष विक्रमसिंह चौहान व नगरसेवक कुलदीपसिंह ठाकूर हे दोघे अजूनही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. कल्पना गिरी अत्याचारप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेसवर तोफ डागली. याबरोबरच मोदींची लातूर दौऱ्यात गिरी कुटुंबीयांनी भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले होते.
या प्रकरणातील दोन आरोपी आठ महिन्यांपासून फरारी आहेत. केंद्र व राज्य सरकार नेमके काय करीत आहे? राज्य सरकारने गिरी कुटुंबीयांना आíथक मदत देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी ही मदत नाकारून ही रक्कम दोन फरारी आरोपींच्या तपासासाठी खर्च करा. मात्र, आरोपींना ताब्यात घ्या, असे सरकारला कळवले आहे. गिरी प्रकरणाचा खटला चालवण्यासाठी सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी. या प्रकरणातील सर्व आरोपींची नार्को चाचणी व ब्रेनमॅिपग करावे. हे प्रकरण सीआयडीऐवजी सीबीआयकडे द्यावे. प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत गिरी कुटुंबीयांना पोलीस संरक्षण द्यावे, या मागण्या गिरी कुटुंबीयांनी केल्या आहेत.
वडिलांची केंद्राकडे याचना
आपण १९७१च्या युद्धात प्रत्यक्ष सहभागी होतो. १९८७मध्ये श्रीलंकेच्या शांतिसेनेत होतो. १९८८मध्ये सैन्यातून निवृत्त झालो. देश सुरक्षित राहावा, यासाठी झटलो. मात्र, प्रत्यक्षात माझ्या कुटुंबीयालाच सुरक्षितता व निर्भयता देण्यास असमर्थ ठरत असल्याचे कल्पना गिरीचे वडील निवृत्त सैनिक मंगल गिरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आपल्याला न्याय देण्याची भीक केंद्र सरकारकडे आपण मागत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.