रसिकांच्या नाटय़जाणिवा प्रगल्भ करणारा प्रायोगिक नाटय़उत्सव अशी ख्याती मिळवलेला आणि त्यामुळेच समांतर मराठी रंगभूमीवर आपली स्वत:ची ओळख अधोरेखित करणाऱ्या वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवलीच्या नाटय़उत्सवाची रूपरेषा जाहीर करण्यात आली आहे. स्त्रियांच्या आणि आजच्या पिढीच्या संवेदनांना भिडणाऱ्या नाटकांचा हा उत्सव १४ ते १९ एप्रिल या कालावधीत येथील प्रतिष्ठानच्या नाटय़गृहात आयोजित करण्यात आला आहे.
नाटय़रसिकांना निवांतपणे नाटकांचा आस्वाद घेता यावा यासाठी खास रसिकांसाठी सलग सुट्टीत जुळवून आणलेल्या ६ दिवसांच्या या नाटय़उत्सवात आजच्या प्रायोगिक रंगभूमीवरील वेगळी, आशयघन आणि विशेषत: जगण्याच्या गुंतागुंतीचा पैस दाखविणारी नाटके सादर होणार आहेत. आधुनिक भारतीय रंगभूमीचा विकास अधोरेखित करणारे नाटय़ प्रयोग आजवर या नाटय़उत्सवात सादर झाले. या वर्षीही अशीच नाटके निवडण्यात आली असल्याने स्थानिक नाटय़रसिकांनी ती पाहणे ही एक त्यांच्या दृष्टीने नाटय़पर्वणीच ठरणार आहे.
गुरुवार, १४ एप्रिलला रात्रौ ९.३० वा. जयंत पवार यांच्या ‘तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य’ कथेचे नाटय़ अभिवाचन विख्यात नाटय़ दिग्दर्शक-अभिनेते अतुल पेठे करणार आहेत. रहस्यकथेचा मार्ग जसा निरनिराळ्या प्रश्नांच्या वाटा-पायवाटांमुळे प्रशस्त होत जातो. त्याच शैलीने जयंत पवार या साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कथालेखकाच्या ‘तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य’ या कथेचा नेमकेपणाने आस्वाद घेता येतो. त्यातही अतुल पेठे यांच्यासारखा कसलेला नाटय़कर्मी कथेचे नाटय़अभिवाचन करत असल्यामुळे कथेचा आशय कथेतील अल्पविरामासह नेमकेपणाने नाटय़रसिकांपर्यंत पोहचतो!
शुक्रवार, १५ एप्रिलला रात्रौ ९.३० वा. प्रणव सखदेव लिखित-दिग्दर्शित, अभिनय कल्याण निर्मित ‘आयडी अर्थात ‘आयचे डिक्न्सट्रक्शन’ हे नाटक सादर होणार आहे. नाटकात ऑफिस बॉयला फेसबुकवर अकाऊंट उघडल्यावर कळतं की तो लेखक आहे. यातून त्याची ‘स्व’ची मोडतोड सुरू होते. फसबुकच्या आभासि, मुक्त जगात त्याला हवी तशी त्याची आयडेंटिटी ठेवता येते आणि त्यातूनच त्याचा स्व शतखंडित होत जातो. त्यालाच त्याच्यात बसणाऱ्या या अनेक आयडींची ‘ओळख’ होऊ लागते आणि गंभीर गंमती घडू लागतात.
लेखिका उर्मिला पवार यांचं ‘आयदान’ हे महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार प्राप्त आत्मकथन. दिग्दर्शिका सुषमा देशपांडे यांना ते खूप भावले. त्याचं नाटय़रूपांतर म्हणजेच अरुण काकडेंच्या अविष्कार निर्मित ‘आयदान’ हे स्त्री जाणिवेचे नाटक. कोकणात दलित घरात जन्माला आलेल्या आणि वाढलेल्या उर्मिलाला प्रथम दलित असल्याची जाणीव झाली. पुढे एका टप्प्यावर ती स्त्री असल्याची जाणीव खूपच भान आणणारी होती. या साऱ्या प्रवासाकडे मिश्कीलपणे पाहण्याची तिची क्षमता, तिला उभं राहण्याची ताकद देते. अशा अनेक उर्मिलांचं, विमलाचं, सुशीलाचं किंवा दलित स्त्रीचं आयुष्य उर्मिला शब्दांत विणून ठेवते. त्यामुळे नाटकातून ‘आयदान’प्रमाणे अनेकीचं जगण एका आत्मकथनाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतं.
रविवार, १७ एप्रिलला रात्रौ ९.३० वा. वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान निर्मिती ‘गाईच्या शापाने’ नाटक सादर होणार आहे. संजय पवार लिखीत हे नाटक रघुनाथ कदम यांनी दिग्दर्शित केले आहे ते शरद सावंतसह अन्य कलाकारांनी सादर केले आहे.
सोमवार, १८ एप्रिलला रात्रौ ९.३० वा. पणजी अभिव्यक्ती निर्मिती ‘प्रवास’ हे नाटक सादर होणार आहे. लेखन-दिग्दर्शन साईश देशपांडे यांचे आहे. अथोल फुगार्दच्या ‘अ रोड टु मेक्का’वर आधारित असलेल्या या नाटकाची पाश्र्वभूमी गोव्यातील एका वृद्ध विधवेच्या घरातील आहे. एकाकी पडलेल्या तिच्या आयुष्याचा प्रवास, त्यातील दाहकता या नाटकात उलघडत जाते.
१९ एप्रिलला फोंडा-गोवा हंस थिएटर निर्मित कवींद्र फळदेसाई लिखित विजयकुमार नाईक दिग्दर्शित ‘संवेदना डॉट कॉम’ या नाटकाचे दोन प्रयोग सादर होणार आहेत. पहिला सायंकाळी ७ वा. तर दुसरा रात्री ९.३० वा. फेसबुक साइडवर अडकल्याने संवेदना हरवलेल्या युवा पिढीची वृत्ती दर्शविणारे हे नाटक आहे.
१९ एप्रिलला अजून एक नाटक ‘डी.एन.ए.’ हे प्रसाद बनारसे दिग्दर्शित आणि शामला बनारसे रूपांतरित सादर होणार आहे. याचेही दोन प्रयोग सादर होणार असून पहिला रात्रौ ८वा. तर दुसरा १०.३० वा. सादर होणार आहे. जिऑर्गोस नियोफायटू या मूळ लेखकाच्या या नाटकात युद्ध का करतो? ज्या कारणासाठी युद्ध करतो त्याच कारणासाठी माणसं मरतात का? मारतात का? त्यांना शहीद म्हणून आपण सुखानं जगू शकतो का? डी.एन.ए. नाटक असे अनेक प्रश्न त्रास देत राहतात.
तरी या नाटय़उत्सवाचा नाटय़ रसिकांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन आचरेकर प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
अनोखी इफ्तार मेजवानी; हिंदू महिलांकडून मुस्लिम महिलांसाठी गोड भेट
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी
mahesh manjrekar
“सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चित्रपट बनवणार”, महेश मांजरेकरांचं वक्तव्य; शिवसेना-मनसेबाबतही केलं भाष्य