चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरून कॉंग्रेसने वेळीच काही शिकले नाही आणि जनलोकपाल विधेयक आणण्यास टाळाटाळ केली, तर लोकसभेच्या निवडणुकीतही मतदार त्यांना धडा शिकवतील, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी सोमवारी राळेगणसिद्धीमध्ये व्यक्त केले. जनलोकपाल विधेयक संसदेत मंजूर झालेच पाहिजे, यासाठी अण्णा हजारे मंगळवारपासून राळेगणसिद्धीमध्ये बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.
ते म्हणाले, गेल्या एक वर्षापासून राज्यसभेत लोकपाल विधेयक पडून आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून माझ्याशी पत्रव्यवहार करण्यात येत असून, त्यामध्ये केवळ नवीन आश्वासने दिली जातात. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक मंजूर करून घेऊ, असे आश्वासन दिले गेले. त्यानंतर पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घेऊ, असे आश्वासन देण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात हे विधेयक मंजूर करून घेण्यात आलेले नाही. आश्वासनांपलीकडे पंतप्रधान कार्यालयाकडून काहीही घडलेले नाही. जनलोकपाल विधेयक मंजूर करून घेण्यात उदासीनता दाखवल्यामुळे चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत मतदारांनी कॉंग्रेसला नाकारले. मतदारांनी आपला राग मतपेटीतून व्यक्त केला, असेही अण्णा हजारे म्हणाले.
जोपर्यंत भ्रष्टाचारमुक्त भारताचे निर्माण होत नाही, तोपर्यंत आपला लढा सुरूच राहिल, असे स्पष्ट करून विधानसभा निवडणुकीतील निकालांवरून कॉंग्रेसने काही शिकले नाही, तर आगामी लोकसभा निवडणुकीतही मतदार त्यांना चांगला धडा शिकवतील, असेही त्यांनी सांगितले.