मासळीच्या पाचपट दंड

शासकीय धोरणानुसार र्निबध घालण्यात आलेल्या राखीव सागरी क्षेत्रात मच्छीमारी करणाऱ्या चार पर्ससिननेटधारकांविरुद्ध येथील मत्स्य विभागाने मासळीच्या मूल्याच्या पाचपट दंड आकारण्याची कारवाई केली आहे. पावसाचा जोर ओसरल्यामुळे समुद्रात पुन्हा मासेमारी सुरू झाली आहे. मात्र गेल्या फेब्रुवारी महिन्यात शासनाने जाहीर केलेल्या मासेमारीविषयक धोरणानुसार पर्ससिननेटधारकांना किनाऱ्यापासून बारा वावपर्यंत मासेमारीला बंदी आहे. या र्निबधाचे उल्लंघन करून शहराच्या समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात राजिवडा, भगवती बंदर आणि मिरकरवाडा येथील मच्छीमारांच्या चार पर्ससिननेट बोटी मासेमारी करीत असल्याचे मंगळवारी संध्याकाळी उघडकीस आले.  त्यामुळे मत्स्य विभागाचे साहाय्यक आयुक्त व्ही. एम. भादुले व

त्यांच्या सहकाऱ्यांनी या बोटींवर छापे मारून एकूण सुमारे २० हजार रुपयांची मासळी जप्त करून या उत्पन्नाच्या पाचपट दंड आकारण्याची शिफारस केली आहे.

कोकण किनारपट्टीवरील पारंपरिक मच्छीमार आणि पर्ससिननेटधारकांमध्ये गेले काही महिने संघर्ष सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात त्यातून काही हिंसाचाराच्याही घटना घडल्या. त्यामुळे राज्य शासनाने मासेमारीविषयक नवीन धोरण जाहीर केले. त्यानुसार माशांच्या निर्वेध वाढीसाठी, तसेच पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या संरक्षणासाठी पर्ससिननेटसारख्या मोठय़ा यांत्रिक नौकांना समुद्रकिनाऱ्यापासून बारा वावपर्यंत मासेमारीला पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. पण अनेकदा या बोटी नियमभंग करून या हद्दीच्या आत मासेमारी करीत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यावरून पारंपरिक मच्छीमारांचे त्यांच्याशी संघर्ष होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. तसेच यांत्रिक नौकांच्या अशा गैरप्रकारांकडे मत्स्य विभाग काणा डोळा करीत असल्याचा या मच्छीमारांचा आरोप आहे.

या पाश्र्वभूमीवर नव्याने वाद उफाळू नये म्हणून येथील मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. संबंधित पर्ससिननेटधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्यावरील दंडात्मक कारवाईची शिफारस तहसीलदारांना करण्यात आली आहे.