दुष्काळाच्या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कोणत्याही बँकेने कर्जवसुलीसाठी तगादा लावू नये. कर्जवसुलीसाठी बँकेने साधी नोटीस पाठवली तरी बँकेवर कारवाई करण्याची तंबी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, तसेच जिल्हा अग्रणी बँकेचे ए. एम. महाजन यांनी  दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. तत्पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हय़ातील बँकेच्या अधिकाऱ्यांची बठक घेतली. जिल्हय़ावर दुष्काळाचे सावट असून सर्व ९४३ गावात ५० पेक्षा कमी पैसेवारी आली. जिल्हय़ात आतापर्यंत दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. जिल्हय़ात महिनाभरात प्रथमच एवढय़ा संख्येने आत्महत्या झाल्या आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांवर बँका व खासगी सावकारांची कर्जे होती. कर्जवसुलीच्या जाचामुळेच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे बँकांनी कोणत्याही स्थितीत यापुढे कर्जवसुलीस नोटीस पाठवू नये, असे आदेशच बठकीत देण्यात आले.
जिल्हाधिकारी पोले व अग्रणी बँकेचे महाजन यांच्या आवाहनास प्रतिसाद देताना कोणतीही बँक शेतकऱ्याला यापुढे नोटीस पाठवणार नसल्याचे वचनच बँकेच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बठकीत दिले.