पिंपरी-चिंचवडमध्ये मद्य धुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मद्य धुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या १७८ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. विशेष विशेष म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा यंदा कारवाईचे प्रमाण कमी आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात वाहतूक पोलिसांचे सात विभाग आहेत. पोलिसांनी ‘ब्रेथ अॅनालायझर’ मशिनमार्फत मद्यपी चालकांची तपासणी केली. त्यामध्ये १७८ तळीरामांवर कारवाई करण्यात आली आहे. हिंजवडी परिसरात सर्वाधिक ६६ मद्यपी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर निगडीत १६, पिंपरीत ३७, भोसरीत १४, चतु:श्रृंगीत १४, आणि सांगवीत २० आणि चिंचवड परिसरात सर्वाधिक कमी म्हणजेच ११ मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

वाहन परवाना न बाळगणा-या, बेकायदेशीर वाहतूक करणा-या १० जणांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. तसेच शहरातील मुख्य चौकामध्ये वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी करून विशेष लक्ष दिले होते. शनिवारी रात्री नऊ वाजल्यापासून ते रविवारी पहाटे पाच वाजेपर्यंत मद्यपी वाहनचालकांची कसून तपासणी करण्यात आल्याचे वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे यांनी सांगितले.