भोकर मतदारसंघातून भाजपची उमेदवारी करणाऱ्या डॉ. माधवराव किन्हाळकर यांना कार्यकर्त्यांना कसे ‘सांभाळावे’ याचे धडे मंगळवारी अनेकांनी दिले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रल्हाद इंगोले, भास्करराव खतगावकर पाटील यांनी त्यांना या बाबत सूचना दिल्या.
निवडणूक रणनीती ठरवण्यासाठी डॉ. किन्हाळकरांच्या निवासस्थानी आयोजित बैठकीत मुदखेड, अर्धापूर व भोकर येथील ३०० ते ४०० पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत इंगोले यांनी किन्हाळकरांनी कार्यकर्त्यांना निराश करू नये, असे म्हटले. ते म्हणाले की, कार्यकर्त्यांचे तुम्हाला पटत नसले तरीही त्याला ‘हो’ म्हणा. नंतर तुम्हाला करायचे ते करा, म्हणजे दोघांचेही समाधान होईल. तोंडावर नाही म्हटल्यास त्याला अपमान वाटतो. एखाद्या घरातील म्हातारीला मतदान केंद्रावर नेऊन मतदान करवून घेण्यासाठी कार्यकर्त्यांचे वेडच कामाला येते. तेथे शहाणपण चालत नाही, असे सुनावताच सूर्यकांता पाटील व खतगावकरांना हसू आवरले नाही.
खतगावकर यांनी या वेळी नरेंद्र मोदींच्या व्यक्तिमत्त्वाची छाप माझ्यावर पडली, यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे काँग्रेसवाल्यांच्या मस्तीला वैतागून काँग्रेस सोडली. ३० वर्षे काँग्रेसमध्ये काढली. त्यामुळे हा पक्ष सोडताना दु:ख निश्चितच झाले. मोदींचे हात बळकट करणे हे आपले ध्येय आहे. लोकसभेचीच पुनरावृत्ती विधानसभेत होईल. केंद्रात ज्या पक्षाचे सरकार आले, त्याच पक्षाचे सरकार राज्यातही येईल. त्यामुळे भोकरमध्ये डॉ. किन्हाळकर यांना निवडून आणायचे आहे. त्यासाठी सर्वाना बरोबर घ्यायचे आहे. राम चौधरी यांनाही बरोबर घ्यावे लागेल, असे सांगितले.
इंगोले यांच्या भाषणाचा धागा पकडून खतगावकर म्हणाले की, पोराच्या नोकरीसाठी शिफारशीस आलेल्या व्यक्तीला नाही म्हणता येत नाही. नोकरी लागणार नाही, हे माहिती असते. परंतु कॉल तरी येऊ दे, मुलाखत झाल्यावर सांग, अशी गोलगोल उत्तरे देत त्याचे समाधान करावे लागते. कारण आपल्याला निवडणूक लढवायची असते, असे म्हणताच उपस्थितात हशा पिकला. सूर्यकांता पाटील यांनी नेहमीच्या शैलीत अशोकरावांना धारेवर धरत ‘आठवा निजाम’ अशी निर्भर्त्सना केली व ही निजामशाही उखडून टाकण्याचे आवाहन केले. नोटा घेऊन येणाऱ्यांना गोटा घाला, असा सल्लाही कार्यकर्त्यांना दिला. पाटील यांनी ‘नागनाथ घिसेवाड यांना कुठेही जायचे नाही, भोकरमध्येच राहायचे. समाजापुरता उरू नको, त्याचे नंतर पाहता येईल’, असा सल्ला दिला.