आधार क्रमांकाच्या माध्यमातून लाभार्थिच्या बँक खात्यावर थेट अनुदान वितरित करण्याच्या केंद्र सरकारच्या घोषणेला सकारात्मक प्रतिसाद देऊन नंदुरबार जिल्ह्याने देशातील पहिली ‘आधार’मय शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या थेट आधारसह उघडलेल्या बँक खात्यात जमा केली. देशातील नागरिकांना एक वेगळी ओळख निर्माण करून देणाऱ्या आधार कार्ड योजनेची सुरूवातही याच आदिवासीबहुल भागात झाली होती.
नंदुरबार जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांच्या आधारमय बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. या निर्णयाची अमलबजावणी नववर्षांच्या पहिल्याच दिवशी भारतीय स्टेट बँकेच्या विसरवाडी शाखेतून करण्यात आली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री अ‍ॅड. पद्माकर वळवी, जिल्हाधिकारी ओमप्रकाश बकोरिया, सहाय्यक जिल्हाधिकारी सुमन रावत आदी उपस्थित होते. सरकारी योजनांचे अनुदान थेट लाभार्थिच्या बँक खात्यात जमा करण्याची महत्वाकांक्षी योजना एक जानेवारीपासून देशातील निवडक २० जिल्ह्यांमध्ये लागू केली जात आहे.
 त्यात नंदुरबारचा समावेश आहे. याचा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून अभिमान असल्याचे अ‍ॅड. वळवी यांनी नमूद केले. वर्षभरात अधिकाधिक जिल्हे आणि सरकारी योजनांचा थेट अनुदान योजनेत समावेश होणार आहे. नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही योजना केवळ बँक खात्यापुरती मर्यादित न ठेवता तिला आधार ओळखपत्र क्रमांकाची जोड देवून अधिक पारदर्शकता आणण्याचा निर्णय कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
 यामुळे संपूर्ण देश नंदुरबारकडे ‘आधार’मय अनुदान योजनेत पथदर्शक म्हणून पहाणार आहे. जिल्ह्यातील ४१ हजार ७१६ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आधारकार्डसह बँकेच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. तसेच विसरवाडी येथील बाल कामगारांच्या शाळेतील १६ विद्यार्थ्यांच्या थेट आधारमय बँक खात्यावर त्यांची जानेवारी २०१३ ची शिष्यवृत्ती जमा होईल. जिल्ह्यात अशा प्रकारची शिष्यवृत्ती पटकाविण्याचा मान चांदणी सुभाष गोसावी या बाल कामगार विद्यार्थिनीला मिळाला.
असे अनुदान प्राप्त करणारी ही कदाचित देशातील पहिली विद्यार्थिनी असेल, असे जिल्हाधिकारी बकोरिया यांनी नमूद केले. आधारमय क्रमांकासह बँकेतील खात्यात शिष्यवृत्ती जमा झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अजय भिल, शुभांगी गोसावी, सलमा शेख, नीलेश गोसावी, निलोफर शेख, विकास भिल, शिवानी गोसावी, सचिन साळुंखे, जिवाली गावित, गणेश भिल, वादल भिल, रोहित मांगले, अरविंद भिल, अतुल गोसावी, मेहूल गोसावी यांचाही समावेश आहे.