आरोग्य विभागाकडे हस्तांतरानंतर दुसऱ्यांदा नादुरूस्त

सातपुडय़ातील नर्मदा काठावरच्या गावांना आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी मोठा गाजावाजा करत युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेली कोटय़ावधी रुपयांची बोट (तरंगता दवाखाना) हस्तातरणानंतर दुसऱ्यांदा नादुरुस्त झाल्याने वापर न होता पडून आहे. सुमारे दीड कोटी रुपयांची बोट नादुरुस्त होत असल्याने या बोटीच्या खरेदीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेष म्हणजे बोट खरेदी करण्यात आलेल्या कंपनीबरोबर पुढील पाच वर्षांपर्यत दुरुस्ती देखभालचा करारही झाला असतांना संबंधित कंपनीच्या दुर्लक्षामुळे नर्मदाकाठच्या आरोग्य यंत्रणेत कोणतीही सुधारणा झालेली नाही.

सातपुडय़ाच्या अतिदुर्गम भागात नर्मदा काठावरच्या गावांना तत्पर आरोग्य सेवा मिळावी व रुग्णांना तत्काळ औषधोपचारासाठी नेण्यासाठी आरोग्य विभागाने दीड कोटीची एक अशा तीन बोट अर्थात तरंगता दवाखान्याची खरेदी केली. त्यातील एका बोटचे १६ जानेवारी रोजी युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. अद्याप दोन बोटींचे लोकार्पण आणि हस्तांतरण बाकी असताना पहिलीच बोट तांत्रिक बिघाडामुळ नादुरुस्त होऊन वापराविना पडून असल्याने या बोटींच्या खरेदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जानेवारीत लोकार्पणानंतर नंदुरबार जिल्हा आरोग्य विभागाकडे ही बोट प्रत्यक्षात २१ जून रोजी हस्तांतरीत करण्यात आली. त्यानंतरही ती चुकीच्या जागेवर उभी करण्यात आल्याने आणि तिच्या खालचे पाणी ओसरल्याने बोट आठ महिने वापराविना धूळ खात पडून होती. काही दिवसांपूर्वी ती सुरु झाल्यावर दोन महिन्यात तिच्यात दुसऱ्यांदा तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे आरोग्य विभाग हतबल झाला आहे.

या आधीही बोट नादुरुस्त झाल्यानंतर आरोग्य विभागाने बडोद्याहून बोटीचे भाग मागवून ती सुरु केली होती.

आता पुन्हा बिघाड झाल्याने करायचे काय, असा प्रश्न आरोग्य विभागासमोर उभा आहे. ही बोट हस्तांतरीत झाल्यापासुन जवळपास पाच वर्षे या बोटीची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी संबंधीत बोट कंपनीची असून तशा प्रकाराचा करारनामाही करण्यात आला आहे. मात्र सदर कंपनीचे तंत्रज्ञच येत नसल्याने आणि या बोटी थेट मुंबईहून खरेदी झाल्याने नंदुरबारची आरोग्य यंत्रणा निरुत्तर ठरत आहे.