मुंबई महापालिकेतील वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ‘टॅब’ खरेदीच्या मुद्यावर युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मौन बाळगले. शनिवारी भगूर येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मारकाच्या नुतनीकरण कामाचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेनेच्या युवराजांनी ‘टॅब’च्या विषयासह विरोधकांबद्दल या ठिकाणी काहीच बोलायचे नसल्याचे सांगितले.
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक नुतनीकरण तसेच विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी शनिवारी ते नाशिक दौऱ्यावर आले
होते. क्रांतीसूर्याच्या स्मारकाचे भूमिपूजन करणे आपल्यासाठी गौरवाचे आहे. महान व्यक्तिमत्वाच्या गावात येऊन श्रध्दांजली वाहण्यात धन्यता वाटली. सावरकरांचे स्मारक बांधून शिवसेना थांबणार नाही, या ठिकाणी पर्यटकांनी भेट द्यावी यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. युतीचे शासन विकास कामांसाठी कटिबध्द असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.