पालकमंत्री प्रकाश मेहता यांचे निर्देश

जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत असलेल्या विकास कामांबाबत सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, सदस्य जागृत असल्याने प्रशासनाने अत्यंत सतर्कतेने काम करून विकास कामांना गती द्यावी, असे निर्देश गृहनिर्माण, कामगार, खनिकर्म मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी सोमवारी दिले. मेहता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बठकीत ते बोलत होते. या बठकीला केंद्रीय मंत्री अनंत गीते, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे, आमदार जयंत पाटील, सुरेश लाड, भरत गोगावले, धर्यशील पाटील, प्रशांत ठाकूर, पंडित पाटील, मनोहर भोईर, जिल्हा विकास समितीचे सदस्य, तसेच जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे आदी मान्यवर उपस्थित होते.

बठकीत मार्गदर्शन करताना पालकमंत्री जिल्हा नियोजन समितीच्या मागील बठकीतील विविध प्रश्नांच्या पूर्ततेबाबत आढावा घेतला. त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजनाच्या संदर्भात सतर्क राहून जिल्ह्य़ातील कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण करावीत तसेच डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत असलेल्या विषयाचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचेही त्यांनी सांगितले.

या वेळी वन विभाग, विद्युत वितरण कंपनी, खनिकर्म विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, भूसंपादन विभाग, आरोग्य विभाग,  खारलॅण्ड विभाग, राष्ट्रीय महामार्ग, पाणीपुरवठा आदी विभागांतील विविध कामांसंबंधात सविस्तर चर्चा करण्यात आली. या चच्रेत सर्व सदस्यांनी सहभाग घेतला. काही प्रश्न केंद्र शासनाच्या अधिनस्त असल्याने त्यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी दिले.

या बठकीला अपर जिल्हाधिकारी पी.डी.मलीकनेर, अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे, कोकण विभागाचे उपआयुक्त मकरंद देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) किरण पाणबुडे, कृषी विभागाचे कोंकण विभागप्रमुख डॉ. अशोक लोखंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के. बी. तरकसे, तसेच राष्ट्रीय महामार्ग, सिडको, आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.

नियोजन मंडळाच्या बठकीनंतर जिल्ह्य़ातील खरीप हंगाम नियोजना संदर्भातदेखील सविस्तर चर्चा करण्यात आली. खत वाटप, सुधारित बियाणे वाटप त्याचप्रमाणे मालासाठीचे गोडाऊन यासाठी अत्यंत उपयुक्त अशा सूचना आमदारांनी व उपस्थित सदस्यांनी दिल्या. त्या सूचनांचे पालन करावे, असे निर्देश पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी दिले.

या वेळी कृषी विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या पंतप्रधान पीक विमा योजना व परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रिय शेती) याची माहिती असलेल्या भित्तिपत्रकांचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्रातिनिधिक स्वरूपात काही शेतकऱ्यांना सुधारित बियाणांचे वाटप करण्यात आले.