विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांचे वर्चस्व असलेल्या श्रीरामपूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली असून, युती सरकारने काँग्रेसला धक्का दिला आहे.
बाजार समितीची मुदत यापूर्वी संपली होती. पण आघाडी सरकारमध्ये विखे हे पणनमंत्री असल्याने त्यांनी यापूर्वी दोनदा मुदतवाढ दिली होती. आता मुदत संपल्याने समितीवर राहुरीचे सहायक निबंधक सर्जेराव कांदळकर यांची नियुक्ती केली आहे.
बाजार समितीचे सभापती दीपक पटारे हे असून सत्तारूढ गटाच्या संचालकांनी कारभाराबद्दल तक्रारी केल्या होत्या. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले होते. जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे यांनी चौकशी सुरू केली होती. आता प्रशासक आल्याने पूर्वीच्या संचालक मंडळाच्या कारभाराची चौकशी होऊन कारवाई होण्याची शक्यता आहे. नियमबाह्य गाळेवाटप संस्थेला भोवण्याची शक्यता आहे. संचालक मंडळाची मुदत संपली असून, चालू महिना अखेरीलाच निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यास उपनिबंधक हौसारे यांनी दुजोरा दिला. ससाणे व आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या गटाकडे बाजार समिती ही सहकारातील एकमेव संस्था आहे.