राहुरी येथील तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक करू, असे भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी सांगितले.
तनपुरे कारखान्याची आर्थिक स्थिती बिकट झाली असून शेतकरी व कामगारांचे देणे थकले आहे. कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. तसेच कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी कोणतेही प्रयत्न व्यवस्थापनाने केले नाही. त्यामुळे आता कारखाना बंद राहण्याची शक्यता आहे. निवडणुकीत तनपुरे कारखान्याचा प्रश्न चांगलाच गाजला होता. आमदार कर्डिले यांनी शुक्रवारी वाघाचा आखाडा, तांदूळवाडी, कोंढवड, शिलेगाव आदी भागांत आभार दौरा केला. या वेळी कर्डिले यांनी तनपुरे कारखान्यावर प्रशासक नेमणुकीसाठी सरकारकडे प्रयत्न केले जातील, हा कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा ठेवण्यासाठी प्रयत्न करू, प्रशासक आल्यानंतर कारखाना मालकीची १५० एकर जमीन असून राष्ट्रीय स्तरावर निविदा काढून त्या विक्रीच्या पैशातून पुन्हा एकदा कारखान्याला पूर्वीचे दिवस मिळू शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तनपुरे कारखाना हा माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या ताब्यात असून रामदास धुमाळ, शिवाजी गाडे आदी नेत्यांचा प्रभाव आहे. यापूर्वी कर्डिले यांनी कधीही कारखाना कारभारात हस्तक्षेप केला नव्हता. पण आता त्यांनी प्रथमच लक्ष घातले आहे. कारखान्याचे ज्येष्ठ संचालक सुभाष पाटील यांनी निवडणुकीत कर्डिले यांची साथ धरली होती. त्यामुळे पाटील यांच्या नेतृत्वाखालील प्रशासक मंडळ आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे संकेत कर्डिले यांच्या वक्तव्यामुळे मिळाले आहेत. मुळा नदीपात्रातील बंधारे भरण्यासाठी मुळा धरणातील पाणीसाठा राखीव ठेवावा म्हणून सरकारकडे प्रयत्न करू तसेच रेल्वे स्टेशन उड्डाणपूल, राहुरी एसटी डेपो, विजेचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन कर्डिले यांनी दिले. त्यांच्या दौऱ्यात भाजपचे तालुकाध्यक्ष नानासाहेब गागरे, विक्रम तांबे, सुभाष गायकवाड, शरद पेरणे, शरद बाचकर, अर्जुन पानसंबळ आदी सहभागी झाले होते.