कोकणातील सागरी किनाऱ्यावर २३ ठिकाणी साहसी पर्यटनाला शासनाने मान्यता दिली आहे.

जिल्ह्य़ातील मालवण तालुक्यासह कोकणातील चारही जिल्ह्य़ांतील सागरी किनारी पर्यटनाचा आराखडा महाराष्ट्र बंदर विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील मालवण, रत्नागिरी जिल्ह्य़ातील आरेवारे, गणपतीपुळे, मुरुड, हर्णे, गुहागर, दाभोळ व आंजर्ले, रायगड जिल्ह्य़ातील वसोली, किहिम, नागाव, अलिबाग, आक्षी, पालव, रेवदंडा, काशीद, मुरुड, दिवेआगार, श्रीवर्धन, हरिहरेश्वर व ठाणे जिल्ह्य़ातील वसई व मांडवा या समुद्रकिनाऱ्यांवर साहसी, जलक्रीडा पर्यटन घोषित करण्यात आले आहे. या योजनेत यांत्रिक व विनायांत्रिक अशा दोन्ही प्रकारांचा समावेश असणार आहे.

यात वॉटर पॅरासेलिंग, बनाना बोटिंग, विंड सर्फिग याचबरोबर कोनोइंग, कयाकिंग, वॉटर राफ्टिंग आदी क्रीडा प्रकारांचा समावेश असणार आहे.

राज्याला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे आणि या किनारी भागाला दरवर्षी सुमारे साडेसहा कोटी भारतीय, तर पाच लाख विदेशी पर्यटक भेट देत असतानाही या पर्यटकांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला जलपर्यटनाचा अपेक्षित महसूल मिळत नाही.

तसेच हे जलक्रीडा प्रकार चालविणाऱ्या संस्थाही संघटित नाहीत. त्यामुळे पर्यटकांना सुविधा व योजनांचा एक प्रकल्प तयार करण्यात येत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात मालवण किनारपट्टीचा साहसी जलक्रीडा योजनेसाठी समावेश करण्यात आला आहे; पण जिल्ह्य़ात अशा १९ सागरी किनारपट्टी पर्यटनदृष्टय़ा महत्त्वाच्या आहेत. त्यांचा समावेश करण्यात आलेला नाही.

त्यामुळे बंदर विभागाने त्यांचा प्रस्ताव द्यावा, अशी मागणी आहे. पर्यटकांसाठी या क्रीडा प्रकारासाठी काम करणाऱ्या संस्थांची निवड करण्यात येणार आहे. तसेच पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी अशा संस्थांनी पाच लाखांचा विमा उतरवावा, अशा अटी घालून संस्था निवडण्यात येणार आहेत. या संस्थांना फीदेखील कमीच ठेवली जाणार आहे.

कोकणात जलसाहसी पर्यटन आणि जलक्रीडा प्रकाराच्या माध्यमातून पर्यटकांना सुविधा देण्याचा शासनाच्या बंदर विभागाने प्रस्ताव केला आहे.