लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा रणसंग्राम संपल्यानंतर आता कार्यकर्त्यांमध्ये हातघाईची लढाई सुरू झाली आहे. ताडकळस येथे शिवसेना व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास हाणामारी झाली. यात शिवसेनेच्या सर्कल प्रमुखावर अॅट्रॉसीटीचा, तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर दरोडय़ाचा गुन्हा दाखल झाला.
पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथे गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत घमासान सुरू होते. शुक्रवारी रात्री दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांत हाणामारी झाली. शिवसेनेचे सर्कल प्रमुख गोपाळ अंबोरे यांनी सहकाऱ्यांसह मारहाण केल्याची तक्रार राष्ट्रवादीचे कार्यकत्रे रामकिशन फुलवरे यांनी दिली. राष्ट्रवादीचा प्रचार का केला? अशी विचारणा करून जातिवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप फुलवरे यांनी तक्रारीत केला. या तक्रारीवरून गोपाळ अंबोरे व विशाल गाढवे या दोघांविरुद्ध ताडकळस पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. भगवान अंबोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून रामकिशन मुंजाजी फुलवरे, शेख महेमुद शेख उस्मान, लक्ष्मण मुंजाजी फुलवरे, प्रभाकर मुंजाजी फुलवरे, शेख हमीद शेख उस्मान, शेख उस्मान तांबोळी यांच्यावर दरोडय़ाचा गुन्हा दाखल झाला. तुळजाई बिअर बारमध्ये घुसून गळ्याला चाकू लावत ९० हजार रुपये पळविल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. या घटनेनंतर ताडकळस येथे शनिवारी तणावपूर्ण शांतता होती.