शहरातील रस्त्यांच्या मुल्यांकनाशिवाय कोल्हापूर टोलमुक्त करणे अशक्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. टोलविरोधी कृती समितीने शनिवारी एन.डी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली टोलप्रश्नी तोडगा काढण्यासाठी भाजपचे राज्य अधिवेशन सुरू असलेल्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मात्र, शहरातील रस्त्यांचे मुल्यांकन झाल्याशिवाय कोणताही निर्णय घेणे शक्य नसल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी टोलविरोधी समितीला आश्वासन देण्याचे टाळले. मुल्यांकनाचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच ते पूर्ण होईल. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून लढा देणाऱ्या टोलविरोधी समितीने आणखी काही दिवस थांबावे, असे आवाहन फडणवीसांनी यावेळी केले. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत आम्ही मुख्यमंत्र्यांचा शब्द खाली पडून देणार नाही, असे सांगत एन.डी.पाटील यांनी आणखी काही दिवस थांबण्यास तयार असल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर संपूर्ण कोल्हापुरात आयआरबीचे एकही खोके दिसायला नको, असे पाटील यांनी म्हटले.
कोल्हापूरमधील टोलमुक्तीसंदर्भात आम्हाला तोंडदेखला निर्णय घ्यायचा नाही. कारण, तो न्यायालयात टिकेल की नाही याची शाश्वती नाही.  त्यामुळे रस्त्यांचे बांधकाम करणाऱ्या आयआरबी कंपनीला कशाप्रकारे पैशांचा परतावा देता येईल याचा योग्य तो विचार करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या सगळ्यासाठी राज्याचे सहकारमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. दरम्यानच्या काळात कोल्हापुरातील एमएच ०९ या क्रमांकाच्या गाड्यांना आणि कोल्हापुरकरांना पासेस देऊन टोलमुक्त करण्याची तयारीही देवेंद्र फडणवीस यांनी दर्शविली आहे.