जिल्ह्यातील २५८ कलावंतांना गेल्या जूनपासून मानधन मिळाले नसल्याने त्यांची परवड होत आहे. गेल्या दोन वर्षांत एकाच वेळी निवड झालेल्या १२० कलावंतांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली असली, तरी अधिकाऱ्यांच्या सहीविना घोडे अडले आहे.
राज्यातील कीर्तनकार, शाहीर आदी कलावंतांची उतरत्या वयात आबाळ होऊ नये, यासाठी राज्य सरकारने कलावंतांना मानधन देण्याचा निर्णय घेतला. यात वर्गवारी करण्यात आली. ‘अ’ दर्जाच्या कलावंताला १ हजार ८००, ‘ब’ ला १ हजार ४००, ‘क’ ला १ हजार २००, तर ‘ड’ ला १ हजार रुपये दरमहा मानधन देण्याचा निर्णय घेतला होता. हिंगोली जिल्ह्यात २५८ कलावंत आहेत. िहगोली ४७, औंढा नागनाथ ३८, कळमनुरी ४५, सेनगाव व वसमत प्रत्येकी ३५ अशी संख्या आहे. यात ६० कलावंतांचा समावेश झाल्याने हा आकडा २५८ झाला. या कलावंतांना मार्च ते जूनदरम्यानच्या मानधनाची रक्कम मिळाली.
कलावंतांच्या मानधनाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय सरकारने दोन महिन्यांपूर्वीच घेतला होता. परंतु तो अजून अमलात आला नाही. कलावंतांना गेल्या चार महिन्यांपासून मानधनाची रक्कमही मिळाली नाही. जिल्ह्यातील कलावंतांच्या मानधनापोटी दरमहा सुमारे २१ लाख निधी येतो. परंतु जूननंतर निधी न आल्याने मानधनाअभावी कलावंतांची परवड होत आहे.