जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील संचालकांच्या सहा जागा आता बिनविरोध झाल्या असून, उर्वरित १५ जागांसाठी ३४ उमेदवार अंतिमत: रिंगणात राहिले आहेत. विखे गटाने ऐनवेळी राष्ट्रवादी-थोरात आघाडीशी केलेला युतीचा प्रयत्न ऐनवेळीच फिसकटल्याने बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्न फसले आणि ही निवडणूकही पुन्हा राष्ट्रवादी-थोरात गट विरुद्ध विखे गट अशीच झाली आहे. मात्र मधल्या दोन तासांतील युतीच्या नाटय़मय घडामोडींमुळे यातील गोंधळ वाढला.
बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. सुमारे दोनशेपेक्षा अधिक इच्छुकांनी त्यांचे अर्ज शुक्रवारी मागे घेतल्याने बँकेच्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. यातील राष्ट्रवादी-थोरात गटाचे उमेदवार निश्चित आहेत. मात्र विखे गटाचे उमेदवार अद्यापि निश्चित नाहीत.
निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत. सेवा संस्था : अकोले- सीताराम गायकर (राष्ट्रवादी), शिवाजी धुमाळ. संगमनेर- रामदास वाघ (थोरात गट), रंगनाथ खुळे. श्रीरामपूर- इंद्रभान थोरात (राष्ट्रवादी), जयंत ससाणे. नेवासे- यशवंतराव गडाख (राष्ट्रवादी), भगवान गंगावणे. जामखेड- जगन्नाथ राळेभात, रामचंद्र राळेभात. कर्जत- विक्रम देशमुख (थोरात), अंबादास पिसाळ. श्रीगोंदे- प्रेमराज भोईटे, बाबासाहेब भोस. कोपरगाव- बिपीन कोल्हे, अशोक काळे. शेतीपूरक संस्था: रावसाहेब शेळके (थोरात), दादासाहेब सोनमाळी. बिगरशेती संस्था: आमदार अरुण जगताप (राष्ट्रवादी), सबाजी गायकवाड. महिला (दोन जागा): मीनाक्षी साळुंके (थोरात), चैताली काळे (राष्ट्रवादी), अश्विनी केकाण, प्रियंका शिंदे, सुरेखा कोतकर. अनुसूचित जाती-जमाती : आमदार वैभव पिचड (राष्ट्रवादी), अशोक भांगरे. इतर मागासर्गीय: सुरेश करपे (विखे गट), अनिल शिरसाठ (राष्ट्रवादी-थोरात), बाबासाहेब भोस आणि विशेष मागास प्रवर्ग: बँकेचे अध्यक्ष बाजीराव खेमनर (थोरात), शिवाजी शेलार, सुभाष गीते.
मोहरा इरेला!
राष्ट्रवादी-थोरात गटाशी ऐनवेळी युती करण्याचा विखे यांचा प्रयत्न फसल्याने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व बँकेचे विद्यमान संचालक तथा माजी अध्यक्ष पांडुरंग अभंग यांनाच निवडणुकीतून बाहेर जावे लागले. ही युती झाल्याचे सुरुवातीला जाहीर झाल्यानंतर इतर मागास वर्गातील जागा विखे गटाला गेली. ते पाहून अभंग यांनी दुपारी १२.३० वाजता येथील उमेदवारी अर्ज मागे घेतला, मात्र त्यानंतर ऐनवेळीच दुपारी २.३० वाजता विखे यांच्याशी झालेली युतीच फिसकटली. हे समजल्यानंतर अभंग माघारीचा अर्ज पुन्हा मागे घेण्यास आले, मात्र नियमानुसार ते शक्य नसल्याने त्यांना रिंगणाच्या बाहेरच जावे लागले. यामुळे येथे काही वेळ गोंधळही झाला.