मध्यंतरीच्या दोन दिवसांच्या काहीशा विश्रांतीनंतर मुळा-भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा मुसळधार पावसास सुरुवात झाली आहे. त्यामुळे धरणात होणारी पाण्याची आवक वाढली असून, भंडारदरा धरण ३५ टक्के भरले आहे, तर मुळा धरणाचा पाणीसाठा सव्वाआठ टीएमसी झाला आहे. तालुक्याच्या पूर्व भागातही आज पावसाने हजेरी लावली.
आज सकाळपासून कळसूबाई-हरिश्चंद्रगडाच्या डोंगररांगांत संततधार सुरू आहे. घाटघर, रतनवाडी, भंडारदरा परिसरात पावसाच्या काही जोरदार सरी कोसळल्या. दिवसभराच्या बारा तासांत भंडारदरात २४ मिमी पाऊस पडला. याच बारा तासांत धरणाच्या पाणीसाठय़ात २०६ दशलक्ष घनफुटाने वाढ झाली. सायंकाळी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ३ हजार ८०० दशलक्ष घनफूट झाला होता. तर निळवंडे धरणाच्या पाणीसाठय़ातही चोवीस तासांत ६६ दशलक्ष घनफुटाने वाढ होऊन तो ८६६ दशलक्ष घनफूट झाला.
हरिश्चंद्रगड परिसरात पडत असणाऱ्या पावसामुळे मुळा नदीची वाढलेली पाणीपातळी टिकून आहे. सायंकाळी कोतूळजवळ मुळा नदीचा विसर्ग ३ हजार २२२ क्युसेक होता तर मुळा धरणाचा पाणीसाठा ८ हजार २०० दशलक्ष घनफूट झाला आहे. रविवारी घाटघर, रतनवाडी परिसराचा अपवाद वगळता पाणलोट क्षेत्रात विशेष पाऊस पडला नव्हता. सोमवारी दिवसभरात तालुक्याच्या पूर्व भागातही पावसाने हजेरी लावली. सकाळी अकोले शहर आणि परिसरात पावसाची एक चांगली सर येऊन गेली. सायंकाळीही हलका पाऊस पडला. अर्थात पूर्व भागात पेरण्यांसाठी अजून पावसाची गरज आहे.