अशोक लांडे खूनप्रकरणातील मुख्य आरोपी भानुदास कोतकर याचा जामीनअर्ज मुंबई उच्च न्यायालयानेही फेटाळला. दरम्यान, नाशिकच्या जिल्हा न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू झाली असून पुढची सुनावणी येत्या दि. २८ ला होणार आहे.
या प्रकरणातील मुख्य फिर्यादी शंकरराव राऊत यांनी ही माहिती दिली. कोतकर याच्याच विनंतीनुसार हा खटला नगरहून नाशिकच्या जिल्हा न्यायालयात वर्ग झाला आहे. हा खटला वर्ग झाल्यानंतर कोतकर याने नाशिकच्या जिल्हा न्यायालयात जामीनअर्ज दाखल केला होता. तो जिल्हा न्यायालयाने फेटाळल्यानंतर कोतकर याने त्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. येथे सुनावणी होऊन दि. १४ ला हा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला. गेल्या दि. ७ ला नाशिक जिल्हा न्यायालयात या खटल्याचे दोषारोपपत्र निश्चित झाले असून, त्यामुळेच उच्च न्यायालयाने हा जामीनअर्ज फेटाळला असे राऊत यांनी सांगितले. कोतकर याने याआधी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातही जामीनअर्ज केला होता. नोव्हेंबर ११ मध्ये तोही फेटाळण्यात आला होता.
दरम्यान, नाशिक जिल्हा न्यायालयात या खटल्याची दोषारोपपत्राची निश्चिती झाल्यानंतर सुनावणी सुरू झाली आहे. मंगळवारी त्याची सुनावणी अपूर्ण राहिली. पुढील सुनावणी येत्या दि. २८ला होणार आहे, अशी माहिती राऊत यांनी दिली. खटल्याची सुनावणी नाशिक जिल्हा न्यायालयात सुरू असली, तरी कोतकर हा सध्या नगरच्या जिल्हा रुग्णालयातील न्यायबंदी आहे. तो व अन्य आरोपींच्या नगरहून नाशिकला जाण्या-येण्यात विस्कळीतपणा येत असल्याचे नमूद करून या सर्वाना नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवावे अशी मागणी राऊत यांनी केली असून तसा अर्जही ते संबंधित यंत्रणेकडे देणार आहेत.