शिरोळ येथील श्रीदत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची पंचवार्षकि निवडणूक संस्थेच्या इतिहासात प्रथमच बिनविरोध झाली आहे. या संचालक मंडळात दोन महिलांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. यामुळे कारखान्यावरील आमदार सा. रे. पाटील यांचे वर्चस्व पुनश्च सिद्ध झाले आहे. निर्णयाची अधिकृत घोषणा २८ जुलै रोजी सभासदांच्या विशेष सभेत केली जाणार आहे. विद्यमान संचालक मंडळातील पाच संचालकांना वगळण्यात आले आहे.
दत्त साखर कारखान्याच्या पंचवार्षकि निवडणुक २१ जागांसाठी जाहीर झाली होती. पाच जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरित उत्पादक सभासद मतदारसंघातून निवडून देण्यात येणाऱ्या सोळा जागेसाठी एकोणीस अर्ज दाखल होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी या गटातून तिन्ही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. यामुळे सोळा जागांसाठी सोळा उमेदवारी अर्ज असल्याने बिनविरोध निवडणुकीवर शिक्कामोर्तब झाले. यापूर्वी उमेदवारी अर्ज छाननीप्रक्रियेत आठ अर्ज अवैध ठरले होते.
नवे संचालक मंडळ याप्रमाणे- डॉ. अप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील (जांभळी), गणपतराव पाटील (जांभळी), अनिलकुमार यादव (शिरोळ), अरुणकुमार देसाई (सदलगा), विनया घोरपडे (कुरुंदवाड), रणजित कदम (शिरदवाड), इंद्रजित पाटील (बेडकीहाळ).(कोंडिग्रे, रणजित पाटील (धरणगुत्ती), शरदचंद्र पाठक (कुन्नूर), युसूफसाहेब मेस्त्री (शिरोळ), खेमा कांबळे (बस्तवाड), यशोदा कोळी (उदगाव), संगीता पाटील-कोथळीकर(गणेशवाडी), अण्णासाहेब पवार (देसाई इंगळी), बसगोंडा पाटील (खिद्रापूर), बाबासाहेब पाटील (अब्दुललाट), प्रमोद पाटील (अर्जुनवाड), रघुनाथ पाटील (चंदुर), सिदगोंडा पाटील (कागवाड), श्रेणिक पाटील (चाँदशिरदवाड).