बँक कर्मचारी २३ टक्के वेतनवाढीसाठी उद्या (बुधवारी) संपावर जाणार असल्याने जिल्ह्यातील बँकांचे व्यवहार बंद राहणार आहेत. संपाचा परिणाम दैनंदिन व्यवहार व एटीएमवर होणार आहे.
गेल्या आठवडय़ात मोहरम व गुरू नानक जयंती अशी शासकीय सुटी होती. त्यानंतर रविवार व सोमवारी दलित संघटनांचा परभणी ‘बंद’ व निषेध मोर्चा यामुळे शहरातील सर्वच एटीएम केंद्रे बंद होती. बँकेचे व्यवहार अध्रे शटर खाली घेऊन आतमध्ये सुरू होते. ‘बंद’मुळे नागरिकांना मात्र बँक व्यवहारासाठी बाहेर पडता आले नाही. गेल्या आठवडय़ापासून बँकेचे नियमित व्यवहार होत नसल्याने ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मंगळवारी बँक व्यवहार सुरळीत चालू होते. परंतु उद्या पुन्हा बँक कर्मचारी संपावर जाणार असल्याने बँकेचे कामकाज बंद राहणार आहे.
बँक कर्मचाऱ्यांच्या संपात राष्ट्रीयीकृत बँकेच्या कर्मचाऱ्यांसोबत प्रादेशिक ग्रामीण बँक कर्मचारी संपात सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे कार्याध्यक्ष चंद्रकांत िशदे यांनी दिली. बँक कर्मचाऱ्यांनी संप यशस्वी करावा, असे आवाहन रामराव िशदे, आर. बी. सावंत, कॉ. ए. एम. देशमुख, सुरेखा गिरी आदींनी केले आहे.