राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड यांनी चार दिवसांपूर्वी उपजिल्हाधिकारी अभय कलगुटकर यांना मारहाण केली होती. त्याच्या निषेधार्थ शनिवारी कोकण विभागातील महसूल अधिकारी व कर्मचारी यांनी लेखणी बंद आंदोलन केले. त्यामुळे रायगड जिल्ह्य़ातील सर्वच महसूल कार्यालयांमधील कामकाज ठप्प झाले होते.

रिलायन्स गॅसवाहिनींच्या मुद्दय़ावरून कर्जत येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुरेश लाड यांनी उपजिल्हाधिकारी अभय कलगुटकर यांना भर सभेत मारहाण केली होती. सुरुवातीला हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र त्याचा व्हिडीयो व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापले. अखेर लाड यांच्याविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

या घटनेचे पडसाद राज्याच्या व राजकीय आणि शासकीय वर्तुळातही उमटले. अधिकारी संघटनांनी याची गंभीर दखल घेतली. शुक्रवारी राजपत्रित अधिकारी महासंघाच्या बठकीत या घटनेचा निषेध करण्यात आला. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

कलगुटकर मारहाणप्रकरणी शनिवारी संपूर्ण कोकणातील महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन छेडले. महसूल विभागातील सर्वच कर्मचारी संघटना यात सक्रिय सहभागी होत्या. त्यातच रायगड जिल्ह्य़ातील तलाठी ते उपजिल्हाधिकारी पदापर्यंतचे सर्व जण मिळून दीड हजार अधिकारी- कर्मचारी सहभागी झाले होते.

रायगड जिल्ह्य़ातील कोतवालापासून उपजिल्हाधिकारी पदापर्यंत जवळपास दीड हजार अधिकारी- कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यामुळे तलाठी, मंडल अधिकारी, तहसीलदार ते जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज ठप्प झाले होते. कर्मचारी हजर झाले. मात्र कामाच्या जागेवर उपस्थित नव्हते. त्यामुळे एरव्ही गजबजलेल्या शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट जाणवत होता. अधिकारी, कर्मचारी जागेवर नसल्याने नागरिकांना काम न होताच परतावे लागत होते.

आंदोलनात सहभागी :

  • उपजिल्हाधिकारी- १४
  • तहसीलदार- १९
  • नायब तहसीलदार- ६२
  • मंडळ अधिकारी- ७०
  • तलाठी- ३७०
  • लिपिक – ३२७
  • अव्वल कारकून – २९८
  • कोतवाल – ३७०
  • एकूण – १५३०