एमआयएमचे नेते आमदार अकबरोद्दीन ओवैसी यांची सोलापूरच्या होम मैदानावर सभा सुरू होण्यापूर्वी चार हुतात्मा पुतळ्यांजवळ अज्ञात तरुणांच्या जमावाने ओवैसी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. तर पांजरापोळ चौकात किरकोळ दगडफेक झाली.
ओवैसी हे सोमवारी रात्री सभेसाठी येण्यापूर्वीच सायंकाळी अचानकपणे चार हुतात्मा पुतळ्यांजवळ १०-१५ तरुणांच्या एका जमावाने एकत्र येऊन ओवैसी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली व त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. घटना घडल्यानंतर पोलीस तेथे दाखल झाले. दरम्यान, पांजरापोळ चौकात अज्ञात व्यक्तींनी केलेल्या किरकोळ दगडफेकीत एका सफारी गाडीसह तीन ऑटोरिक्षांचे नुकसान झाले. त्यामुळे त्या भागात तणावाचे वातावरण पसरले होते.