राज्य सरकारने दुष्काळावर उपाययोजना करण्याच्या घोषणा केल्या असल्या, तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही. सरकारने दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेतले नाही, तर काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने रस्त्यावर उतरेल, असा इशारा पक्षाच्या राज्यस्तरीय दुष्काळ पाहणी पथकाने पत्रकार बैठकीत दिला.
माजी खासदार तुकाराम रेंगे, माजी आमदार कल्याण काळे, अॅड. त्र्यंबकदास झंवर यांच्या पथकाने जिल्हय़ातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेतला. लातूर तालुक्यातील भिसेवाघोली येथील आत्महत्याग्रस्त जयद्रथ भिसे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. रेंगे पाटील म्हणाले की, सरकारने दुष्काळग्रस्त भागातील वीजबिल थकबाकीपोटी वीजजोडणी तोडू नये, अशी घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात वीजतोड होत आहे. बँकांना कर्जवसुली थांबवण्याचे आदेश दिले असतानाही वसुलीच्या नोटिसा सुरूच आहेत. दुष्काळाच्या प्रश्नावर सरकार गंभीर नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
गेल्या महिनाभरात मराठवाडय़ात ७१४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आत्महत्येचे सत्र थांबत नसून उलट ते वाढतच आहे. केंद्र व राज्य सरकारांनी शेतकऱ्यांच्या मनात आपल्या कृतीतून विश्वास निर्माण केला पाहिजे. आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना अडीच लाख रुपयांची मदत दिली जावी व ती तातडीने देण्याची गरजही पथकाने व्यक्त केली. पीकविम्याची मंजूर रक्कम तातडीने शेतकऱ्यांना दिली जावी. शिवसेनेने मागील महिन्यात दुष्काळग्रस्तांना हेक्टरी ५० हजार रुपये दिले जावेत, अशी मागणी पत्रकार बैठकीत केली होती. तीच आपलीही मागणी असल्याचे या प्रसंगी सांगण्यात आले. अॅड. व्यंकट बेद्रे, माजी आ. वैजनाथ िशदे उपस्थित होते.