अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या मागणीसह या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
अंगणवाडी सेविका व मदतनिसांना केंद्र सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, तोपर्यंत वाढती महागाई लक्षात घेता सेविकांना दरमहा १० हजार रुपये, तर मदतनिसांना साडेसात हजार रुपये मासिक मानधन द्यावे, १० ऑगस्ट २०११ रोजी केंद्र सरकारने अंगणवाडी सेविकांच्या सेवाशर्ती ठरविण्यासंबंधी गठीत केलेल्या महिला सबलीकरण समितीच्या शिफारशींची तात्काळ अंमलबजावणी करून मानधन वाढवावे. तसेच राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्र्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण करावे, या मागणीसाठी राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन जिल्हा शाखेतर्फे संघटनेच्या राज्य सचिव कॉ. माधुरी क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. आंदोलनात राजश्री गाडे, अर्चना कुलकर्णी, सुनीता धनले, आशा गाढे, गोदावरी राऊत, सविता ढाले आदी सहभागी झाल्या होत्या.
जालन्यात मोर्चा
जालना- अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ‘आयटक’ प्रणीत संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. देवीदास जिगे आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले.