जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती असताना महसूल विभागाने चुकीची पीक आणेवारी काढून शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्याचा घाट घातला आहे. महसूल विभागाने ५३ टक्के दाखवलेली आणेवारी रद्द करून पुन्हा नव्याने आणेवारी काढण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव यांनी केली आहे.
जिल्ह्यात सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस पडलेला आहे. जो पाऊस पडला तोही खंडित स्वरूपाचा असल्याने यंदाचा खरीप हंगाम वाया गेला आहे. शेतकऱ्यांनी तीनदा पेरणी करूनही काहीच उगवले नाही. जे उगवले ते पुन्हा पावसाअभावी करपून गेले. मूग, उडीद, हायब्रीड ही पीके तर उगवलीच नाहीत. सोयाबीनचा उतारा अवघा एक ते दीड क्विंटलचा आला आहे. कापूस, तूर या नगदी पिकांची अवस्थाही अत्यंत बिकट आहे. खरीप हंगाम हातचा गेलेला असताना दुसरीकडे जमिनीत ओल नसल्याने रब्बी पेरण्याही थांबल्या आहेत. दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झालेली असताना शेतकऱ्यांना पाणी आणि चाराटंचाईलाही सामोरे जावे लागत आहे. शासनाने शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी त्यांना आणखी अडचणीत आणण्याचा घाट घातला आहे. महसूल विभागाने सज्जानिहाय नजर पीक आणेवारी काढली असून पीक आणेवारी ५३ टक्के दाखवली आहे. जिल्ह्यात ४५ टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमान झालेले असताना ५० टक्क्यांहून अधिक आणेवारी दाखवण्याचा प्रताप महसूल विभागाने केला आहे. जास्तीच्या आणेवारीमुळे शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळणार नाही. त्यामुळे चुकीची आणि जास्तीची आणेवारी रद्द करून तात्काळ नव्याने पाहणी करून ५० टक्क्यांपेक्षा कमी दाखवावी, अशी मागणी शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.