सोलापूर शहराचा विस्कळीत झालेला पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी पुढील महिनाभर तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांचा प्रस्ताव पालिका पदाधिकारी तथा सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या बैठकीत फेटाळला गेला. मात्र तीन दिवसाआड पाणीपुरवठय़ाचा निर्णय तूर्त तरी टाळता येणार नसल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.
शहरात आतापर्यंत दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून त्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने पाणीसाठा उपलब्ध असूनदेखील दुष्काळाप्रमाणे तीन दिवसाआड पाणीपुरवठा करणे भाग पडत असल्याचे पालिका आयुक्त गुडेवार यांनी स्पष्ट केले. पाणीपुरवठय़ात झटपट सुधारणा करण्यासाठी आपल्याकडे जादूची कांडी नाही, असेही त्यांनी नमूद केले.
विस्कळीत पाणीपुरवठय़ाच्या प्रश्नावर एकीकडे नागरिकांत संतापाची भावना व्यक्त होत होऊन पालिका परिमंडळ कार्यालयांवर मोर्चे येत असताना दुसरीकडे पालिका पदाधिकाऱ्यांनी सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी प्रश्नांची उकल करून नेमके कोणते उपाय योजावेत, यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. या वेळी महापौर अलका राठोड यांच्यासह आमदार दिलीप माने, पालिका सभागृह नेते महेश कोठे, काँग्रेसचे शहराध्यक्ष धर्मा भोसले, राष्ट्रवादीचे गटनेते दिलीप कोल्हे, विरोधी पक्षनेते कृष्णाहरि दुस्सा आदी उपस्थित होते. उजनी धरणासह भीमा नदीवरील टाकळी बंधारा व हिप्परगा तलाव अशा तीन उद्भवांतून शहराला पाणी मिळते. परंतु पाण्याची मागणी व उपलब्ध पाणी यात मोठी तफावत असल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे आयुक्त गुडेवार यांनी या बैठकीत बोलताना स्पष्ट केले. पाणीपुरवठय़ाच्या निश्चित वेळा ठरल्या नाहीत. नागरिकांना रात्री उशिरापर्यंत पाण्याची प्रतीक्षा करावी लागते. रात्रभर जागरण करून पाणी भरावे लागते. उद्भवांमध्ये पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात असूनदेखील शहरवासीयांना पाणी मिळत नसल्याची तक्रार उपस्थित करण्यात आली. त्यावर टाकळी व उजनी या दोन्ही पाणी योजनेतील जलवाहिन्या खराब व कालबाहय़ झाल्या असून, त्यामुळे पाण्याची गळती होते. यातच शहराची लोकसंख्या वाढत असताना त्या प्रमाणात पाणीपुरवठय़ाच्या यंत्रणेत सुधारणा झाली नाही. परिणामी पाणीपुरवठा विस्कळीत होतो, असे गुडेवार यांनी सांगितले. तथापि, तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा आयुक्तांचा प्रस्ताव या बैठकीत फेटाळण्यात आला. पाणीपुरवठय़ात गळती नव्हेतर मोठय़ा प्रमाणात चोरी होते. त्यावर आयुक्तांनी नियंत्रण ठेवावे, अशी सूचना आमदार दिलीप माने यांनी केली. दोन दिवसाआडऐवजी तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असेल त्याविरोधात उपोषणाला बसावे लागेल, असा इशारा सत्ताधाऱ्यांसह विरोधी नगरसेवकांनी दिला. या वेळी निमित्त साधून आयुक्त गुडेवार यांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला.