सांगलीच्या रिसोस्रेसच्यावतीने सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनाचा मंडप कोसळून झालेल्या दुर्घटनेत शुक्रवारी सकाळी १५ जण जखमी झाले असून त्यापकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजले. संयोजकांनी जखमी झालेल्या लोकांना तत्काळ खासगी रूग्णालयात दाखल केले असल्याने त्यांची नावे सायंकाळपर्यंत समजली नसली तरी पोलिसांनी आयोजक व मंडप ठेकेदाराविरूध्द फिर्याद दाखल केली आहे.
    सांगलीतील एका खासगी संस्थेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले होते. सुमारे तीन एकर परिसरात यासाठी मंडप उभारण्यात आला होता. शुक्रवारी सकाळी मंडपातील शंभर स्टॉल असलेल्या भागातील मंडप अचानक कोसळला. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने प्रदर्शनात उतरण्यासाठी आलेली वाहने याठिकाणी थांबलेली असल्याने जास्त लोकांना इजा झाली नसली, तरी १२ ते १५ लोक जखमी झाले असून त्यापकी तिघांची अवस्था गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना तत्काळ खासगी रूग्णालयात हलविण्यात आले.
गुरूवारीच याठिकाणी प्रदर्शन सुरू झाले असून दुपारपासून मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असते. सकाळच्यावेळी ही दुर्घटना घडली असल्याने फारशी वर्दळ नव्हती. याप्रकरणी श्रीपाद गोपाळराव आचार्य यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी आयोजक राजेश शहा व मंडप कॉन्ट्रॅक्टर सुनील माळी या दोघांविरूध्द निष्काळजीपणामुळे लोकांच्या जीवितास धोका उत्पन्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.