मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गत आठवड्यात शनिवारी राज्यात महाकर्जमाफीचा निर्णय जाहीर केला. परंतु, त्यानंतरही काही शेतकरी संघटना व सुकाणू समितीतील सदस्य या कर्जमाफीच्या निर्णयावर अजूनही नाराज असून ही कर्जमाफी पुरेसे नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सुकाणू समितीवर गंभीर आरोप केला आहे. गरीब शेतकऱ्यांसाठी लढणारी सुकाणू समिती आता श्रीमंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा व्हावा म्हणून पुन्हा आंदोलनाची भाषा करत असल्याचा आरोप केला आहे. बुलडाण्यात ते पत्रकारांशी बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरसकट दीड लाख रूपयांची कर्जमाफी जाहीर केली होती. त्याचा फायदा ८९ लाख शेतकऱ्यांना होणार असून सुमारे ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे.

परंतु, सुकाणू समिती सरसकट कर्जमाफीची मागणी करत आणखी आक्रमक झाली आहे. सरकारने सरसकट कर्जमाफी न केल्यास पुन्हा नव्याने आंदोलन छेडण्याची तयारी समितीचे सदस्य डॉ. अजित नवले, आमदार बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेत्यांनी केली आहे.