कमी पावसामुळे अडचणीत आलेल्या जालना, औरंगाबाद, बुलढाणा व जळगाव या जिल्ह्य़ांतील खरीप पीकस्थितीची केंद्र सरकारच्या द्विसदस्यीय तज्ज्ञांच्या पथकाने पाहणी केली. गुरुवारी हे पथक जालन्यात, तर शुक्रवारी औरंगाबादच्या दौऱ्यावर होते.
अजित सिंग व आशुतोष गवळी या कृषी तज्ज्ञांचा पथकात समावेश होता. जालना जिल्ह्य़ात परतूर व मंठा वगळून सहा तालुक्यांतील १५ पेक्षा अधिक गावांतील २३ ठिकाणी पथकाने पीकस्थिती संदर्भात नोंदी घेतल्या. पथकाचे काम साधारणत: तांत्रिक स्वरूपाचे होते. उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांच्या आधारे या ४ जिल्ह्य़ांतील नापेर क्षेत्राची पाहणी केल्यानंतर पथकाने प्रत्यक्षात काही ठिकाणी नोंदी घेतल्या. ज्या भागात पेरणी झाली नाही, तेथील काही छायाचित्रे पथकाने घेतली. काही ठिकाणी पेरणी झालेल्या पिकांच्या स्थितीची छायाचित्रे घेऊन निरीक्षण नोंदवले. जीपीएस, अर्थात ग्लोबल पोझिशन सिस्टीम या तंत्राच्या आधारे हे निरीक्षण करण्यात आले.
जालना जिल्ह्य़ातील दौऱ्यात कृषी उपसंचालक जी. बी. काळे यांच्यासह त्या-त्या भागातील तालुका कृषी अधिकारी सहभागी होते. जिल्ह्य़ात २३ जुलैपर्यंत खरिपाच्या केवळ २९ टक्के पेरण्या झाल्या. सर्वात कमी ६ टक्के पेरण्या जालना तालुक्यात झाल्याची माहिती कृषी विभागाने पथकास दिली. अन्य तालुक्यांतील पेरण्यांची टक्केवारी : बदनापूर १६, भोकरदन ३१, जाफराबाद १०, परतूर ६१, मंठा ३१, अंबड २५ व घनसावंगी ४५.
लांबलेल्या पावसामुळे जिल्ह्य़ात मूग व उडिद या डाळवर्गीय पिकांची पेरणी फारच कमी झाली. मुगाची ८ टक्के, तर उडिदाची पेरणी ४ टक्केच झाली आहे. सोयाबीनची पेरणी अपेक्षित क्षेत्राच्या ५० टक्के म्हणजे जवळपास २० हजार हेक्टर क्षेत्रावर झाली. जिल्ह्य़ातील कापसाचे अपेक्षित क्षेत्र २ लाख ७६ हजार हेक्टर असताना प्रत्यक्षात जवळपास एक लाख हेक्टर म्हणजे ३६ टक्केच पेरणी झाली.