काँग्रेससह विरोधकांनी सिंचनप्रश्नी अजित पवार यांना आणि रस्ते-टोल प्रकरणात छगन भुजबळ यांना टीकेचे लक्ष्य केले असले, तरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मात्र हे दोन्ही नेते उत्तम प्रशासक वाटतात. निर्णय घेण्याची क्षमता व प्रशासक म्हणून उत्तम कारभार यामुळेच या दोघांवर टीका होत असल्याचे शरद पवार यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार बठकीत बोलताना सांगितले.
सिंचन प्रश्नावर अजित पवार यांची प्रतिमा जाणीवपूर्वक मलिन करण्याचा प्रयत्न केला गेला. तो कोणी व कसा याच्या तपशिलात शिरायचे नाही. पण, तो प्रयत्न जाणीवपूर्वक होता, असेही पवार म्हणाले. ‘उत्तम प्रशासक’ हे शब्द भुजबळ यांनाही लागू पडतात का, असे विचारले असता दोन्ही नेत्यांसाठी ते असल्याचेही पवार यांनी सांगितले.
दक्षिण कराडमध्ये अपक्ष उमेदवारास राष्ट्रवादीने दिलेला पािठबा विचारपूर्वक घेतलेला निर्णय असल्याही पवार यांनी स्पष्ट केले. अपक्ष उमेदवार विलासकाका उंडाळकरांचे नाव न घेता ते म्हणाले, की ते एस काँग्रेसमध्ये होते तेव्हा मी या पक्षाचा अध्यक्ष होतो. त्यांची आमच्या पक्षाला मदत होणार असल्याचे पवार यांनी सांगितले. आघाडी सरकारचा पािठबा न काढता सत्तेच्या खुर्चीत एकत्र व निवडणुकांमध्ये स्वतंत्र, असे चित्र निर्माण झाले असते. त्यावर अधिक टीका झाली असती. त्यामुळे राष्ट्रपती राजवटीसाठी छुपी युती या आरोपात तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेससह विरोधी नेतेमंडळी राष्ट्रवादीच्या सिंचन, सार्वजनिक बांधकाम क्षेत्रावर टीका करीत होते. तुलनेने राष्ट्रवादीचे नेते आरोग्य, शिक्षण यावर कधी बोलताना, सूचना करताना दिसले नाहीत. सरकारमध्ये तसा एकात्म भाव नसल्याचे जाणवले नाही का, असे विचारले असता आमच्या बाजूने एक विचाराने कारभार चालावा, असे प्रयत्न झाल्याचे पवार यांनी सांगितले. सिंचन क्षेत्रात वाढ झाली आहे, हे राज्याच्या प्रमुखांनाच मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी हा मुद्दा उचलून धरला. परंतु या क्षेत्रात काम झाल्याचा दावा पवार यांनी केला. ते काम कंत्राटधार्जिणे नव्हते का, या प्रश्नावर काम कंत्राटदारच करीत असतात. अधिकारी कसे करतील, असे म्हणत त्यांनी हा प्रश्न टाळला. पूर्ण बहुमतासाठीच राष्ट्रवादी प्रयत्न करीत असल्याचा दावा करताना आघाडी तुटल्याने साधनसामग्रीची कमतरता व उमेदवारांसाठी दमछाक झाल्याचेही पवार यांनी मान्य केले.