तत्कालीन आघाडी सरकारमध्ये आमच्यावर सिंचन घोटाळय़ाचे आरोप झाले त्या वेळी आमचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आमच्या बाजूने उभे राहण्याऐवजी विरोधकांनाच साथ देत होते. तर सध्याच्या सरकारमधील मंत्र्यांवर आम्ही आरोप केले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतात. पक्षांतर्गत विरोधक असलेले एकनाथ खडसे यांनाही त्यांनी सरळ केले, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पृथ्वीराजबाबा आणि फडणवीस यांच्या कारभारातील फरक कथन केला.

अजित पवार यांच्या प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमाचे येथे आय़ोजन केले होते. यामध्ये त्यांनी वरील मत व्यक्त करतानाच पुन्हा एकदा पृथ्वीराज चव्हाण यांना लक्ष्य केले. त्या वेळी पृथ्वीराज चव्हाणांनी देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे आमच्यावर आरोप करणाऱ्या विरोधकांबाबत कणखर भूमिका घेतली असती तर आज आमच्यावर ही वेळ आली नसती, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

राज्यात आमच्या काळात ७० हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. परंतु त्याचा एकही पुरावा ते आजतागायत देऊ शकले नाहीत. याउलट, माधव चितळे समितीने राज्यात सहा टक्के सिंचन झाल्याचा अहवाल दिला आहे, असे स्पष्टीकरण देत पवार म्हणाले, आमच्या सरकारने उपसा सिंचन योजना मंजूर करताना सोलापूरच्या उजनी धरणाची उंची वाढविली. त्यामुळे या धरणामध्ये १४ टीएमसी जादा पाणी साठते. कोयना धरणाचीही उंची वाढविली. त्यामध्येही आज सहा टीएमसी जादा पाणी साठते. सोलापूर जिल्ह्य़ात रब्बी पिकांची परंपरा असताना उजनी धरणामुळे तब्बल ३८ साखर कारखाने उभारतात, हे सिंचनवाढीचे म्हणजे विकासाचे द्योतक नाही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एक ‘टीएमसी’ पाणी साचविण्यासाठी ८०० कोटी ते एक हजार कोटी रुपये खर्च होतात. आम्ही सरकारचा पैसा खर्च वाचवून सिंचनाद्वारे विकास कामे केली, असा दावा त्यांनी केला.