अजित पवार शरद पवारांचे बोट धरुन राजकारणात आले, हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र अकलूजच्या एका सभेत बोलताना अजित पवार शरद पवारांवर घसरले. मात्र आपण काहीतरी वादग्रस्त बोललो आहोत, याची जाणीव होताच अजित पवारांनी स्वत:ला सावरुन घेतले.

‘शरद पवार चारवेळा राज्याचे मुख्यमंत्री झाले. मात्र तरीही बारामतीमध्ये प्रादेशिक वाहतूक कार्यालय येऊ शकले नाही. मात्र मी उपमुख्यमंत्री होताच बारामतीमध्ये प्रादेशिक वाहतूक कार्यालय आले’, अशा शब्दांमध्ये अजित पवारांनी स्वत:ची तुलना शरद पवारांसोबत केली. मात्र यामधून आपण शरद पवारांच्या कार्यक्षमतेला कमी लेखत आहोत, याची जाणीव होताच अजित पवारांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.

‘शरद पवारांचे लक्ष राज्यात होते, देशात होते. म्हणून त्यांना या ठिकाणी लक्ष देण्यासाठी वेळ मिळाला नाही’, असे म्हणत अजित पवारांनी आपले विधान दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. ‘शरद पवारांचे लक्ष देशाकडे आणि राज्याकडे असल्याने त्यांना बारामतीमध्ये प्रादेशिक वाहतूक कार्यालय आणणे शक्य झाले नसेल. नाही तर उद्या सर्व वर्तमानपत्रांमध्ये पहिल्या पानावर अजित पवार शरद पवारांवर घसरले ही बातमी असेल’, असे म्हणत अजित पवारांनी मिश्किलपणे आपली बाजू सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला. अजित पवारांच्या या विधानानंतर सभेला उपस्थित असणाऱ्या सर्वांमध्येच हशा पिकला.

‘मी प्रत्येक भाषणाआधी नीट बोलायचे ठरवतो’, असेही यावेळी अजित पवारांनी ठरवले. अजित पवार त्यांच्या रोखठोक वक्तव्य आणि भूमिकांसाठी ओळखले जातात. मात्र याच रोखठोकपणामुळे अजित पवार अनेकदा वादातही सापडले आहेत. त्यामुळेच आता अशा विधानांचा अजित पवारांनी चांगलाच धसका घेतला आहे. मात्र तरीही अकलूजमधील एका कार्यक्रमात स्वत: केलेल्या कामांची माहिती देताना अजित पवारांनी शरद पवारांशी तुलना केली. मात्र या वक्तव्यामुळे अडचणीत येणार हे लक्षात येताच अजित पवारांनी स्वत:ला सावरुन घेतले.

बाबांनो, जरा जपून बोला; अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला

याआधीही अजित पवारांनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. त्याचा मोठा फटका अजित पवारांना बसला आहे. त्यामुळेच चार महिन्यांपूर्वी सोलापूरात झालेल्या एका कार्यक्रमात अजित पवारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना जपून बोलण्याचा सल्ला दिला होता. ‘दुधाने तोंड पोळल्यामुळे माझ्यावर आता ताकही फुंकून पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जिभेवर नियंत्रण ठेवा आणि काळजीपूर्वक बोला. कोणाच्या भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घ्या’, असा महत्त्वाचा सल्ला अजित पवारांनी जून महिन्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला होता.