लोकसभेत शिवसेनेचे निवडून आलेले १८ खासदार म्हणजे नरेंद्र मोदींची कृपा असून त्यात त्यांचे कर्तृत्व काहीच नाही. डरकाळ्या फोडणारा शिवसेना पक्ष आता मांजर झाले आहे, अशी टीका करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
विधानसभा निवडणुकीसाठी तयारीच्या दृष्टीने राष्ट्रवादीच्या वतीने वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्याला अन्न व नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री रमेश बंग, माजी आमदार सुनील शिंदे, आमदार प्रकाश गजभिये, राजू तिमांडे, अतुल लोंढे उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे पाच खासदार पक्षातून बाहेर पडले होते. त्या वेळी त्यांची अवस्था फारच केविलवाणी झाली होती. लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार निवडून येईल की नाही, अशी त्यांच्यावर वेळ आली होती. मात्र, मोदी लाटेत शिवसेनेचे अठरा खासदार निवडून आले आणि त्यांनी जीवदान मिळाले आहे. त्यांच्यात सध्या मस्ती आली आहे. दिल्लीला महाराष्ट्र सदनात एका मुस्लीम धर्मीय कर्मचाऱ्याचा रोजा असताना त्याला पोळी खाऊ घातली. शिवसेनेच्या एका खासदाराला अवजड खाते देऊन मंत्रिपद दिले असताना त्यांनी ते नाकारले होते. मात्र, मोदी यांचा फटका बसल्यावर तांनी ते स्वीकारले. एरवी पाकिस्तानच्या विरोधात प्रखरपणे बोलणारे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे दिल्लीला शपथविधीच्या वेळी नवाझ शरीफ यांच्या विरोधात का बोलले नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शिवसेना आता वाघ राहिली नसून मांजर झाली आहे, अशी टीका त्यांनी केली.
सुनील तटकरे म्हणाले, बारामतीमधील जागा काँग्रेसमुळे निवडून आली, असे माणिकराव ठाकरे यांनी केलेले विधान दुर्दैवी आहे. राज्यात काँग्रेसच्या ज्या केवळ दोन जागा आल्या त्या राष्ट्रवादीमुळे आल्या आहेत, असे म्हटले तर वावगे होणार नाही. जागा वाटप करताना ते सन्मानाने केले गेले पाहिजे. आम्ही १४४ जागांवर आजही ठाम आहोत. अजय पाटील आणि बंडू उमरकर यांनी कार्यकर्त्यांची भूमिका मांडली.