आतापर्यंत काका-पुतण्याचे राजकारण महाराष्ट्राने बघितले, आता यापुढे राज्याला काकू-पुतण्याचे राजकारण पाहायला मिळेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शनिवारी इस्लामपूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात सांगितले. एकीकडे वाढती लोकसंख्या विकासाला मारक असल्याचे तज्ज्ञ सांगत असताना भाजपचे खासदार चार मुलांना जन्म देण्याचा आग्रह धरीत असल्याची टीका त्यांनी केली.
इस्लामपूर येथे घरकुल योजनेचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी आ. जयंत पाटील उपस्थित होते. एकीकडे राज्याचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस हे करीत असताना त्यांच्या काकू शोभाताई फडणवीस यांना टोलमुक्त महाराष्ट्रासाठी आंदोलन करावे लागत आहे. हे काकू-पुतण्याचे राजकारण यापुढे महाराष्ट्राला पाहावे लागेल, असा टोला पवार यांनी लगावला. भाजप जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचे काम करीत असून हे परवडणारे नाही. नथुराम गोडसेचे पुतळे उभे करण्याचे घाटत असल्याचा आरोप केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०० दिवसांत काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे या सरकारने काय केले, असा सवाल त्यांनी केला. या वेळी वाळवा तालुक्यातील ६० हजार कार्डधारकांना मोबाइलवर धान्याबाबत माहिती देण्याच्या योजनेचा शुभारंभ झाला.